You are currently viewing नैसर्गिक शेती व पशुधन संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज : शंकर घारे

नैसर्गिक शेती व पशुधन संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज : शंकर घारे

नैसर्गिक शेती व पशुधन संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज : शंकर घारे

केळूस येथे तालुकास्तरीय कृषी दिन व शेतकरी मेळावा उत्साहात; हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांना अभिवादन

वेंगुर्ले :

भारत हा कृषीप्रधान देश असून, हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या कार्यामुळे कृषी क्षेत्रात मोठे बदल घडून आले आहेत. आता शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत नैसर्गिक शेतीकडे वळण्याबरोबरच पशुधन संवर्धनासाठीही सर्वंकष प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांनी केले.
वेंगुर्ला पंचायत समिती, कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) आणि ग्रामपंचायत केळूस यांच्या संयुक्त विद्यमाने कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त स. का. पाटील विद्यामंदिर, केळूस येथील गुरुवर्य गोविंद मधुसूदन दाभोलकर सभागृहात तालुकास्तरीय ‘कृषी दिन व शेतकरी मेळावा’ आयोजित करण्यात आला. सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, संजय गावडे, सुजाता पडवळ, विजय नाईक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. रणजीत देव्हारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना प्रितेश राऊळ यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या हरितक्रांतीमुळे देशाच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळाल्याचे सांगत, शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीत प्रगती साधावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कृषी दिनानिमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली, तर शालेय विद्यार्थ्यांनी ईशस्तवन, रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम सादर केले. तारादेवी महिला बचत गटाच्या शेतकरी नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले. सूत्रसंचालन व आभार पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा