कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्राचा उपक्रम; जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ४ मध्ये उत्साहात कृषी दिन साजरा
सावंतवाडी :
अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र, सावंतवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४, सावंतवाडी येथे कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या रोपांचे वाटप करून कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण तसेच वृक्षलागवडीचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाट्याला आलेले रोप लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्पही केला.
या कार्यक्रमास अन्नपूर्णा कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, वेंकटेश शेट यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक महेश पालव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्राच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
