You are currently viewing व्हिडीओ गेम पार्लर तरुणांना बरबादीकडे नेणारे.

व्हिडीओ गेम पार्लर तरुणांना बरबादीकडे नेणारे.

जिल्ह्यात लाखोंची उलाढाल होणारे पाच अनधिकृत व्हिडीओ गेम पार्लर.

जिल्ह्यात अनैतिक धंदे जोरदार फोफावले असून मटका, जुगार, क्लब, दारू यांच्या बरोबरीने केवळ एक गेम पार्लर अथवा खेळण्याचे ठिकाण म्हणून परिचित असलेले व्हिडीओ गेम पार्लर हा देखील लाखोंची उलाढाल होणारा अनैतिक धंदा असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्हिडीओ गेम पार्लर चालवणारे मालक मालामाल झाले असून लाखोंची कमाई करत आहेत. वरवर गेम पार्लर हे गोंडस नाव असणारा हा व्यवसाय तरुण युवकांना बरबाद करणारा व्यवसाय असून अनेक मुले त्याकडे आकर्षित होत आहेत.
कोरोनाच्या काळात शाळा, कॉलेज बंद असल्याने अनेक महाविद्यालयीन युवक, शाळेतील मुले सायबर कॅफेमध्ये जाण्याच्या बहाण्याने व्हिडिओ गेम पार्लर मध्ये आपले नशीब आजमावतात, त्यातून मिळणाऱ्या पैशांमुळे ती अवैध व्यवसायाकडे आकर्षित होतात परिणामी तरुण, युवकांना नको असलेली व्यसने लागतात त्यामुळे तरुणपिढी बरबादीकडे चालली आहेत, परंतु व्हिडीओ गेम पार्लर सारख्या व्यवसायातून कमावलेल्या पैशांमुळे माजलेले मालक समाजात ताठ मानेने व्यावसायिक, बिल्डर्स, उद्योजक म्हणून महागड्या गाड्या घेऊन फिरत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ३७ व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहेत, त्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. जिल्ह्यातील ३७ पार्लर पैकी ५ व्हिडिओ गेम पार्लर हे अनधिकृतरित्या सुरू आहेत. त्यापैकी कुडाळ येथील एका व्हिडिओ गेम पार्लरचा परवाना एका जागेतील असून व्हिडीओ गेम पार्लर हा दुसऱ्याच जागी अनधिकृतरित्या सुरू आहे. कुडाळमध्ये, पिंगुळी तिठा, देवगड, कणकवली येथेही विनासायास, विनापरवाना व्हिडीओ गेम पार्लर सुरू असून त्यामध्ये चाललेल्या गैर व्यवहारांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने या व्हिडीओ गेम पार्लरमध्ये कोण खेळतात? त्यांचे काय काय उद्योग चालतात? परवाना आहे का? असल्यास नक्की परवाना कुठला आणि गेम पार्लर कुठे सुरू आहेत याची योग्य ती चौकशी करावी आणि तरुणांना व्हिडीओ गेमच्या माध्यमातून जुगारी प्रवृत्तिकडे घेऊन जाणाऱ्या अनैतिक व्यवसायांवर योग्य ती कारवाई करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा