You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेतला. बागायतदारांचे उत्पादन व उत्पन्न वाढवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू उत्पादकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनातून तसेच डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या समन्वयातून कृषी विभाग सिंधुदुर्ग मार्फत राबवल्या जाणाऱ्या या प्रायोगिक प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे.

हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीवर मात करण्यासाठी हे तंत्रज्ञान क्रांतीकारी ठरेल. हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण कोकणातील फलोत्पादनासाठी हे एक आदर्श ‘स्मार्ट शेती’ मॉडेल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

आधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर करून कीड-रोगांचे वेळेवर निदान करणे आणि हवामानाचा अचूक अंदाज देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील सर्व ८ तालुक्यांमध्ये क्लस्टर पद्धतीने राबवला जाईल. यामध्ये एकूण ४०० शेतकऱ्यांची (२०० आंबा व २०० काजू उत्पादक) क्लस्टर पद्धतीने निवड करण्यात येत आहे. हा प्रकल्प ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.० अंतर्गत राबविण्यात येणार आहे.

या प्रायोगिक प्रकल्पामध्ये खालील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.

वेदर स्टेशन हब: अचूक स्थानिक हवामानाचा डेटा मिळवण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येतील.

मृदा सेन्सर्स व IoT उपकरणे: जमिनीतील ओलावा, तापमान आणि अन्नद्रव्यांचे प्रमाण मोजून, पाण्याच्या संतुलित वापराबाबत थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मराठी भाषेत सल्ला दिला जाईल.

AI व उपग्रह डेटा: सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून पिकांची वाढ, ताण आणि कीड-रोगांची लागण होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना पूर्वसूचना मिळेल.

ड्रोन सेवा व मॅपिंग: डोंगराळ आणि उंच झाडांच्या भागांवर प्रभावी औषध फवारणीसाठी आणि झाडांच्या डिजिटल मॅपिंगसाठी ड्रोनचा वापर केला जाईल.

शेतकऱ्यांना होणारे अपेक्षित लाभ-

१. AI आधारित अचूक आणि वेळेवर मिळणाऱ्या सल्ल्यामुळे उत्पादनात शाश्वत वाढ होईल.

२. उत्पादन खर्चात बचत: पाणी, खते आणि कीटकनाशकांच्या संतुलित वापरामुळे संसाधनांची बचत होऊन शेतकऱ्यांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल.

३. डिजिटल साक्षरता: निवडलेल्या ४०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन ग्रामस्तरावर डिजिटल शेती तंत्रज्ञानाचा विस्तार होण्यास मदत होईल. अशा पध्दतीने ही AI प्रणाली वापरली जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा