मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत घोषणा; बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांवर कडक कारवाईचा इशारा
मुंबई :
राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे तसेच पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांचे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १ जून ते १५ ऑगस्ट असा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
यापूर्वी राज्याच्या सागरी हद्दीत १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांवर बंदी लागू होती. पश्चिम मान्सूनचे आगमन, मत्स्यसाठ्याचे संरक्षण आणि मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला लहान माशांची होणारी मोठ्या प्रमाणातील मासेमारी रोखण्यासाठी विविध मच्छीमार सहकारी संस्थांनी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी शासनाकडे केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा समित्या तसेच राज्य सल्लागार व सनियंत्रण समितीचे अहवाल मागविण्यात आले. दोन्ही समित्यांनी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यास सकारात्मक अभिप्राय दिल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या मते, वाढीव बंदीमुळे मत्स्यसाठ्याचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल. माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळाल्याने भविष्यातील मत्स्यसंपदा टिकवून ठेवणे शक्य होईल. तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीस येणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे मच्छीमारांची संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासही या निर्णयाचा फायदा होणार आहे.
दरम्यान, राज्यात मासेमारी बंदी लागू असताना इतर राज्यांतील मासेमारी नौका महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊन अनधिकृत मासेमारी करत असल्यास त्यांच्याविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिला.
