You are currently viewing टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय; उद्याची परीक्षा पुढे ढकलली

टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय; उद्याची परीक्षा पुढे ढकलली

टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय; उद्याची परीक्षा पुढे ढकलली

भिवंडीत प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आढळल्याने गुन्हा दाखल; पारदर्शकतेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

ओरोस

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी, २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत जिल्हा शिक्षण विभागाने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
राज्यातील एकूण १,०२८ परीक्षा केंद्रांवर टीईटी-२०२६ परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. नीट-२०२६ परीक्षेतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यावेळी सुरक्षिततेच्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
मात्र, शनिवारी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी काही संशयित इसमांवर धाड टाकली. त्यांच्याकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून-२०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पडताळणी केली असता, संशयितांकडे असलेले काही प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे आढळून आले. त्यानंतर भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून, परीक्षेची नवीन तारीख व अन्य अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा