*काव्यप्रेमी महाराष्ट्र साहित्य समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित सामाजिक लेख*
*राष्ट्रहित हरवलेली सत्तेची स्पर्धा*
मित्रांनो, मला तरी तशा अर्थाने राजकारणाशी संबंध नाही. विचार बदलनारे लोक रोज नवी पांयंडे पाडतात त्याची खरच कीव करावीशी वाटते. केळस हा शब्द वापरने तसे योग्य नाही.अशा स्थितीमध्ये तिसऱ्या डोळ्यांनी, तिसऱ्या नजरेने राष्ट्रहित म्हणून पाहणाऱ्या अनेक व्यक्तींच्या समोर थोडासा विचार लिहावा वाटला म्हणून दोन शब्द लिहितो आहे.
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. राजकारण हे समाजसेवेचे, राष्ट्रनिर्मितीचे आणि जनकल्याणाचे प्रभावी माध्यम मानले जाते. परंतु आजच्या काळात राजकारणाचा मूळ हेतू हरवत चालला आहे. विचार, तत्त्वे, निष्ठा आणि मूल्ये यांची जागा सत्तेच्या हव्यासाने घेतली आहे. म्हणूनच आजच्या राजकारणाला *सवंग राजकारण* असे म्हणावे लागते.
पूर्वी राजकारणात विचारधारा महत्त्वाची होती. नेते एखाद्या पक्षाशी, तत्त्वाशी आणि जनतेच्या हिताशी बांधील असत. राष्ट्रहितासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला, संघर्ष केला आणि त्याग केला. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. सत्तेची चाहूल लागली की झेंडे बदलले जातात, विचार बदलले जातात आणि कालपर्यंत ज्यांचा विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्यास अनेकजण तयार होतात.
आज अनेक राजकीय नेत्यांसाठी पक्ष हा केवळ सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग बनला आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी कोणत्याही तडजोडी करण्याची तयारी दिसते. निवडणुकीपूर्वी एक विचार आणि निवडणुकीनंतर दुसरा विचार हे आता सामान्य झाले आहे. जनतेसमोर दिलेली आश्वासने विसरली जातात आणि सत्तेची गणिते मांडण्यातच संपूर्ण वेळ खर्च होतो.
या सवंग राजकारणाची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे राष्ट्रहिताचा अभाव. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, जलसंधारण यांसारख्या मूलभूत विषयांवर गंभीर चर्चा कमी होत आहे. त्याऐवजी आरोप-प्रत्यारोप, द्वेषाचे राजकारण, जाती-पातीचे समीकरण आणि सत्तेसाठी होणाऱ्या राजकीय खेळी यांनाच महत्त्व प्राप्त होत आहे.
देशाच्या विकासासाठी दीर्घकालीन धोरणांची आवश्यकता असते. परंतु सवंग राजकारणात पुढील निवडणूक जिंकणे हाच एकमेव उद्देश उरतो. त्यामुळे समाजातील अनेक गंभीर प्रश्न कायम राहतात. जनतेचा लोकशाहीवरील विश्वास कमी होऊ लागतो आणि राजकारणाबद्दल उदासीनता निर्माण होते.
आज गरज आहे ती राजकारणाला पुन्हा मूल्यांची जोड देण्याची. सत्ता ही साधन असली पाहिजे, साध्य नव्हे. राष्ट्रहित, समाजहित आणि जनकल्याण यांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण झाले पाहिजे. विचारांशी प्रामाणिक राहणारे, जनतेशी निष्ठावान असणारे आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व उभे राहिले तरच लोकशाही अधिक बळकट होईल.
सवंग राजकारणाच्या या अंधारातही आशेचा किरण आहे तो जागृत नागरिकांचा. जेव्हा जनता विचारांना, कार्याला आणि प्रामाणिकतेला मत देईल, तेव्हा राजकारणातील सवंगपणा आपोआप कमी होईल. कारण लोकशाहीत अंतिम शक्ती जनतेच्याच हातात असते.
आज प्रश्न फक्त कोण सत्तेत आहे याचा नाही, तर सत्ता राष्ट्रासाठी वापरली जाते की स्वतःच्या स्वार्थासाठी याचा आहे. जोपर्यंत राजकारणात राष्ट्रहिताचा सुगंध पुन्हा दरवळत नाही, तोपर्यंत सत्तेच्या खुर्चीभोवती फिरणारे हे सवंग राजकारण देशाच्या प्रगतीला बाधा आणत राहील….
मग बदलायचं नको का मला पहिल्यांदा बदला लागेल तुम्हाला बदलावा लागेल आणि सर्वांना बदलव लागेल देशप्रेम राष्ट्रहित मानवी मूल्य घेऊन भारतीय संविधान आत्मसात करून तो धर्म म्हणून विचार करणे गरजेचे आहे तरच राष्ट्रहित साधले जाईल.
चिंतन :- भूमिपुत्र वाघ.
धाराशिव
