You are currently viewing विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

प्रारुप मतदार यादी ५ ऑगस्ट तर अंतिम मतदार यादीची ७ ऑक्टोबरला प्रसिध्दी

सिंधुदुर्गनगरी :

मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी घेतल्या जाणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी व मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत. मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या नावाची नोंद, पत्ता व इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. लोकशाही अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या भागातील केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेची (SIR-2026) माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, प्रारूप मतदार यादी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून, अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर केली जाणार आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून नवमतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, तसेच मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ६ लाख ८८ हजार १४ मतदार आहेत. यामध्ये ३ लाख ४० हजार ४५० पुरुष आणि ३ लाख ४७ हजार ५६४ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीतील नोंदींचे अचूक मॅपिंग आणि विसंगती दूर करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू असून, जिल्ह्यात ९२.४२ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. मतदार यादी पुनरीक्षणासाठी जिल्ह्यात ३ मतदार नोंदणी अधिकारी, १६ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि २१ अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच ९२१ बीएलओ, ९३ पर्यवेक्षक आणि ३ मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, प्रत्यक्ष ‘हँड्स-ऑन’ प्रशिक्षणही यशस्वीपणे पार पडले आहे. राजकीय पक्षांमार्फत १,२९९ बूथ लेव्हल एजंट्स नियुक्त करण्यात आले आहेत. सामान्य नागरिकांच्या तसेच बीएलओंना आवश्यक मदत मिळावी यासाठी मदत कक्ष (Help Desk) कार्यान्वित करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघ तसेच जिल्हास्तरावर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी नियमित बैठका घेण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा