अमरावती :
अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीच्या मिशन आयएएस या प्रकल्पांतर्गत दर महिन्याला 19 तारखेला शिवजयंती नियमितपणे साजरी करण्यात येते. मागील महिन्यात शिवजयंतीचा कार्यक्रम अमरावती परतवाडा रोडवरील सिकची रिसॉर्ट मध्ये घेण्यात आला होता. या 19 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त व 17 जून या तारखेला असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त मिशन आयएएस अंतर्गत स्पर्धा परीक्षेची एबीसीडी या पुस्तकाचे वितरण विनामूल्य करण्यात येणार आहे. या पुस्तकाच्या आतापर्यंत पाच लाख प्रति वितरित झाल्या असून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त या पुस्तकाचे वितरण करण्याचे संयोजकांनी ठरविले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांची पुण्यतिथी 17 जून रोजी असून या दिवशी सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीमध्ये या पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे. हे पुस्तक सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असून वर्ग पाच नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते अतिशय गुणकारी असे आहे. ज्या विद्यार्थ्यांना पालकांना किंवा अद्यापकांना या पुस्तकाची प्रत पाहिजे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी 9890967003 या क्रमांकावर अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी संपर्क साधावा. ज्यांच्याजवळ वाहन नाही अशा विद्यार्थिनींना किंवा दिव्यांग व्यक्तींना हे पुस्तक घरपोच पाठविण्यात येईल. त्यासाठी त्यांना कोणताही पोस्टेज खर्च किंवा अन्य खर्च प्रदान करावा लागणार नाही. दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फक्त एक रुपया मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करून देणाऱ्या डॉ पंजाबराव देशमुख अकादमीने हा अभिनव उपक्रम आखून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण केली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या विविध उपक्रमात आतापर्यंत 373 आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकारी सहभागी झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आयएएस अधिकारी सहभागी होणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. या संस्थेला मागील महिन्यात महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांनी भेट देऊन या संस्थेचा गौरव केला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या उपक्रमाचा लाभ स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी व त्यांच्या अध्यापकांनी घ्यावा असे आवाहन मिशन आयएएसतर्फे करण्यात आले आहे.
