मालवण एसटी स्थानकासमोरील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडग्याची दिशा
आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांचा पुढाकार; एसटी प्रशासन व नगरपरिषदेची संयुक्त स्वच्छता मोहीम सुरू
मालवण
दरवर्षी पावसाळ्यात मालवण एसटी स्थानकासमोर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचून प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती तथा स्थानिक नगरसेविका पूनम चव्हाण यांनी पुढाकार घेत पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह बसस्थानक परिसराची पाहणी केली.
पाहणीदरम्यान बसस्थानक परिसरातील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटाराची गेल्या दहा वर्षांत साफसफाई झाली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गटारामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली होती तसेच माती व कचरा साचल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बंद झाला होता. याचा त्रास एसटी आगारालाही होत असल्याने एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने गटार साफसफाईचे काम हाती घेतले आहे.
एसटी प्रशासनाच्या या सकारात्मक उपक्रमाचे कौतुक करत नगरपरिषदेकडूनही या मोहिमेला पूर्ण सहकार्य देण्यात येत आहे. आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी प्रत्यक्ष पाहणी करून एसटी डेपोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.
तसेच बसस्थानकासमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचू नये यासाठी मुख्य मोरीचीही तातडीने साफसफाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यात या परिसरात पाणी साचण्याची समस्या उद्भवू नये यासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे पूनम चव्हाण यांनी सांगितले.
या पाहणीवेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, नगरसेविका अश्विनी कांदळकर, मोहन वराडकर, स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक श्री. सूर्यवंशी, स्वप्नील गडदे आणि अन्य कर्मचारीही उपस्थित होते.
नगरपरिषद आणि एसटी प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यंदाच्या पावसाळ्यात मालवणवासीयांना पाणी साचण्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
