You are currently viewing 20 जून रोजी ‘पी. एम. किसान उत्सव दिवस

20 जून रोजी ‘पी. एम. किसान उत्सव दिवस

20 जून रोजी ‘पी. एम. किसान उत्सव दिवस’

23 व्या हप्त्याचे घेणार वितरण

 सिंधुदुर्गनगरी,

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल 2026 ते जुलै 2026 या कालावधीतील 23 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 20 जून 2026 रोजी पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून करण्यात येणार आहे. या निमित्ताने केंद्र शासनाने 20 जून हा दिवस देशभर ‘पी.एम. किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

            शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना फेब्रुवारी 2019  पासून सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास ( पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्त्याची 2 हजार रुपयांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.

            पी. एम. किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्यावत ठेवणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे तसेच ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक आहेत. पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी फार्मर आय. डी. असणेही आवश्यक केले आहे.

            या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रे, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs), शेतकरी उत्पादक संघटना (FPOs), सहकारी पतसंस्था (PACS) तसेच विविध कार्यालये व संशोधन केंद्रे  या ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नागरी सुविधा केंद्रांमधूनही शेतकऱ्यांना या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणात सहभागी होता येणार आहे.

             जिल्ह्यात कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in  लिंक वर होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा