देशभरातून 216 विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग
सावंतवाडी
येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘औषध निर्माणशास्त्राची प्रगती आणि भविष्यातील दृष्टीकोन या विषयावरील तिसरी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली . यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (ए.पी.टी.आय.) यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कोव्हीडसारख्या जागतिक आव्हानाच्या पार्श्वभूमीवर औषध निर्माणशास्त्रात वेगाने घडणारे बदल विद्यार्थ्यांना समजावेत या हेतूने ही ऑनलाईन परिषद पार पडली.
यावेळी ए.पी.टी.आय.चे राज्य अध्यक्ष डॉ.सी.डी उपासनी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सद्य परिस्थितीची आवश्यकता म्हणून रोगप्रतिकारक बूस्टर फॉर्मुलेशनच्या विकासासाठी संशोधन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर डॉ.एच.एस.महाजन यांनी नॅनोटेक्नॉलॉजीवर भाष्य करताना या औषध प्रणालीचे महत्व आणि अनुप्रयोग पटवून दिले तसेच नॅनोमेडिसिन च्या विकासात भारतीय कंपन्यांचे योगदान व भविष्यातील संधींवर
प्रकाशझोत टाकला. यानंतर डॉ.भूषण राणे यांनी औषध वितरण प्रणालीतील नाविन्यता, प्रगती आणि भविष्यातील आव्हाने यासंबंधीचे विवेचन केले.
दुपारच्या सत्रात डॉ.सतीश पोलशेट्टीवार यांनी बायोइन्फर्मेटिक्स टूल्स अँड ड्रग डिझाईन डेव्हलपमेंट या विषयासंबंधी माहिती दिली. लस उत्पादन विकास कार्यक्रमात बायोइन्फर्मेटिक्सचे योगदान किती महत्त्वाचे असते हे त्यांनी सांगितले. शेवटच्या सत्रात डॉ. हर्षद कोठावदे यांनी ड्रग फॉर्मुलेशन डेव्हलपमेंट मध्ये गुणवत्तेचे नियमन कसे चालते या विषयाची माहिती दिली.
या परिषदेत तामिळनाडू कर्नाटक गोवा झारखंड महाराष्ट्र इत्यादी राज्यातून एकूण 216 विद्यार्थी आणि शिक्षक ऑनलाइन सहभागी झाले होते.
परिषदेचे आयोजन प्राचार्य डॉ.विजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.डि.एम.शिनकर व प्रा.तुषार रुकारी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.नमिता भोसले यांनी केले.
कॉलेजने सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व संचालक मंडळाने आयोजन समितीचे अभिनंदन केले.