*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधा गर्दे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुला सांगायचे राहून गेले*
(वृत्त: वनहरिणी)
मनात होते बरेचसे पण सांगायाचे राहुन गेले
ओठांवर ते येता येता मनात सारे दडपुन बसले।।
तुझ्याच अंगा खांद्यावर अन् कुशीत झाले होते मोठी
रुसवा,फुगवा हसणे सारे माझे चाले तुझ्या भोवती
रागावुन मी पाय आपटत तुलाच बडवत होते कसले
ओठांवर ते येता येता मनात सारे दडपुन बसले ।।
भातुकलीचा खेळ खेळता, बघितलेस तू किती कौतुकी
खोड्या करता,भांडण होता त्यावेळी ही तूच संगती
मूठ आवळुन, पाठीवरती तुला कसे अन किती मारले
ओठांवर ते येता येता मनात सारे दडपुन बसले ।।
अभ्यासाच्या वेळीसुद्धा जागुन होता तूच सोबती
निकाल येता आनंदाचे उधळित होता कितीक मोती
सखा लाभता माझे मन तर स्वप्नांनी रे होते भरले
ओठांवर ते येता येता मनात सारे दडपुन बसले ।।
माहेराला सोडुन कातर हृदयाने मी पुढे चालले
आप्तेष्टांचे डोळ्यांमध्ये अश्रू होते बहुत साचले
हळूहळू तो उंबरठाही ओलांडुन मी दूर निघाले
ओठांवर ते येता येता मनात सारे दडपुन बसले ।।
गळाभेट मी तुला दिली ना तुझ्याकडे मी वळुन पाहिले
मनात होते जे सारे ते सांगायाचे कसे राहिले
अरे घरा तू श्वास असुन मी वेळेवर का नाही वदले
ओठांवर ते येता येता मनात सारे दडपुन बसले ।।
राधा गर्दे
कोल्हापूर
