*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*मुलीच्या संसारात तिच्या आईची भूमिका..*
नगण्यच असावी.. होय नगण्यच असावी..
माझे लांबचे एक नातलग आहेत. त्यांच्या
मुलीची तीन लग्ने म्हणजे सुरू झालेला संसार
मोडला हो. तो ही आई मुळेच. आजकाल आया
आपल्या घरात बसून मुलीच्या सासरचा कंट्रोल
मुलीकरवी करू बघतात. मुलीवर निर्णय लादून
सासरच्यांना हैराण करू बघतात. सासरची मंडळी खमकी असेल तर बरी..
नाही तर या आयांचे फार फावते.अगदी मूल होऊ
द्यायचे की नाही हे सुद्धा, असे सल्ले सुद्धा या आया देतात. मी तर म्हणते, या आया पागलच झाल्या आहेत.
जावई दुसरीकडे असेल तर या त्याला आपल्या
शहरात यायला भाग पाडतात. प्रसंगी आपल्या
घराजवळंच फ्लॅट घेऊन देऊन तिथे त्यांना शिफ्ट करून जावयाला ताटाखालचे मांजर बनवतात. नवीन- नवीनच संसार सुरू झाला असल्यामुळे जावई कात्रीत सापडतो व भीड
पडल्यामुळे तो बायकोमागे येतो नि मग काय
या निरुद्योगी आयांचे चांगलेच फावते. मुलीला
त्या पूर्ण पांगळेच करून टाकतात. मुलीचे सगळे
निर्णय आयाच घेतात. मुलगी नोकरी करणारी
असतेच. मग मुल झाले की ते तिची आईच सांभाळते. मुलीच्या आईकडच्या खेपा रोजच
चालू होतात. कधी कधी निर्लज्ज मुलगी व जावई
मुले मोठी झाली तरी आईकडेच वाढू देतात. घरात त्यांच्याही स्वत:च्या सुना व मुले असतात.
पण आईमुळे मुलीचे लाड चालूच रहातात. सुनांकरवी स्वयंपाक करवून मुलीकडे डबे पाठवले जातात. मुलीला ते फार गोड गोड वाटते.
भावजया कामे करतात व ह्या नणंदबाई लोळतात.
ह्या साऱ्या प्रकारात त्या सासर पूर्ण दुर्लक्षित करतात व सासू सासऱ्यांना नको तितका मनस्ताप देतात. तुम्हाला “ कोरा कागज” सिनेमा
आठवत असेल. मूर्ख आईमुळे त्यांचा संसारच
मोडतो. मुलीला अक्कल येईपर्यंत खूप उशीर
झालेला असतो. जावई स्वाभिमानी असतो पण
सासू मुळीच आवरली जात नाही. गरीब जावयाकडे ती सामान पाठवतच राहते व जावयाचा स्वाभिमान दुखावून प्रकरण गंभीर बनते. दोघेही पिळून निघतात.
तीच परिस्थिती आज खूप ठिकाणी आहे. आमच्या नाशिकमध्येच किती सासऱ्यांनी जावयाला मुलीला जवळ आणले व सासरच्या
माणसांपासून मुलाला तोडले. अशा वेळी मुलाच्या संसारात विघ्न नको म्हणून आपले अश्रू
पिऊन आईबाप गप्प बसतात.
शेवटी जे पेराल तेच उगवते. मुलीला फुसलावून
ज्या आया सासरच्या मंडळींना त्रास देतात त्यांना
एक दिवस त्याचा हिशोब द्यावाच लागेल. पण त्या साठी मुलीचे डोळे उघडणे आवश्यक आहे.
आईने लुडबुड करू नये हे आईला कळत नसेल
तर सासर व नवऱ्याचा स्वाभिमान जपून मुलीने
आईला समज दिली पाहिजे की, आई मी माझे
पाहून घेईन. मी गरज पडली तर तुझी मदत
घेईन, तो पर्यंत तू आमच्या संसारात लक्ष घालू
नको. स्वत:ला सुशिक्षित म्हणवणाऱ्या आया अशा वेळी आपली सद् सद् विवेकबुद्धी कुठे गहाण टाकतात हा मोठाच गंभीर प्रश्न आहे.
इथे मुलींची भूमिकाच फार मोठी आहे की सासर
माहेरचा समतोल साधून सर्वांना सारखा न्याय कसा देता येईल हे तिने विचारपूर्वक ठरवणे गरजेचे आहे. नाही तर काटा कुठे भलतीकडेच
झुकतो नि त्यात सारे होरपळून निघत भावी पिढीवर त्याचे नक्कीच वाईट परिणाम होतात.
एक गोष्ट मात्र नक्की की अशा आयांना सासरचे व मुलगा यांनी वेळीच समज देऊन चार हात लांब
ठेवावे नाही तर या रिकामटेकड्या आया सतत
धुमाकूळ घालत सासरच्यांचे जीवन मुष्किल करून टाकतात.
आमच्या काळात कुठे फोन होते? दिवाळी शिवाय भेटी होत नव्हत्या. लहान वयात लग्न
होऊनही आम्ही आत्मनिर्भर बनलोच ना? स्वत:च्या हिंमतीवर मुलांना वाढवले व स्वत:ची
प्रगती करून घेतली. मी तर म्हणते, खेड्यातल्या
अशिक्षित आयाच जास्त समंजस होत्या. त्यांनी
लुडबुड तर केली नाहीच शिवाय सल्ले ही योग्य
दिले. संकट असेल तेव्हाच ते धावून आले नि लगेच परत फिरले त्यांच्या संसारात. आणि तेच बरोबर होते.
प्रश्न असा आहे की, या आयांना अक्कल कधी
येणार नि त्या कधी सुधारणार? स्वत:च्या घरात
मात्र त्यांना इतरांची लुडबुड चालत नाही. दुसऱ्याच्या घरात नाक खुपसलेले चालते.
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
