You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहाचा फ्रीजर बंद; मृतदेह ठेवण्याचा गंभीर प्रश्न
Devya suryaji

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहाचा फ्रीजर बंद; मृतदेह ठेवण्याचा गंभीर प्रश्न

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहाचा फ्रीजर बंद; मृतदेह ठेवण्याचा गंभीर प्रश्न

तात्काळ नवीन फ्रीजर उपलब्ध करून द्या; पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार – देव्या सुर्याजी

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहामध्ये सुमारे तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला फ्रीजर कुलिंग देत नसल्याने बंद पडला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत किंवा रात्री-अपरात्री मृतदेह ठेवण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून रुग्णालय प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी यांनी केली आहे.

यापूर्वीही शवागृहातील फ्रीजर बंद पडला होता. त्यावेळी युवा रक्तदाता संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन वर्षांत हा फ्रीजर पुन्हा निकामी झाला असून सध्या तो पूर्णपणे कुलिंग देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नुकतीच यासंदर्भातील एक गंभीर घटना घडली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, रात्री बारा वाजता अचानक फ्रीजरचे कुलिंग बंद पडल्याने रुग्णालय प्रशासनाने मध्यरात्रीच नातेवाइकांना मृतदेह अन्यत्र हलविण्याची सूचना दिली. या अनपेक्षित प्रकारामुळे संबंधित कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.
शवागृहातील ही गंभीर समस्या लक्षात घेता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला तात्काळ नवीन फ्रीजर उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी श्री. सुर्याजी यांनी केली आहे. तसेच या प्रश्नाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा