You are currently viewing तिरोडा खासेवाडी-शिरोडा मार्गावरील लोखंडी साकवासाठी नव्या पुलाची मागणी
Oplus_16908288

तिरोडा खासेवाडी-शिरोडा मार्गावरील लोखंडी साकवासाठी नव्या पुलाची मागणी

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन

सावंतवाडी :

तिरोडा खासेवाडी ते शिरोडा या मार्गावरील लोखंडी साकवाच्या प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांची भेट घेऊन नवीन साकव उभारण्याची मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तिरोडा सरपंच प्रियंका सावंत, उपसरपंच संदेश केरकर तसेच नाणोस सरपंच साक्षी शेट्ये यांनी केली.

तिरोडा खासेवाडी येथील लोखंडी साकव दरवर्षी दुरुस्त करावा लागत असल्याने कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन साकव बांधणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने यावेळी सांगितले. यावर कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी या मार्गाची ग्रामपंचायत दफ्तरी २३ क्रमांकावर नोंदणी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. सर्व शेतकरी बांधवांनी यासाठी सहकार्य करणे गरजेचे असून, जोपर्यंत २३ क्रमांकाची नोंद पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रस्ताव पुढे पाठविणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

या साकवाचा लाभ तिरोडा, नाणोस, रेडी आणि शिरोडा परिसरातील ग्रामस्थांना होत असून विद्यार्थ्यांना शिरोडा हायस्कूलमध्ये जाण्यासाठी, तसेच जिल्हा ग्रामीण रुग्णालय, बाजारपेठ आणि शेतीसंबंधित कामांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.

साकवाचे अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी दिले. तसेच उपअभियंता पाटील यांच्यामार्फत अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रस्ताव सादर करण्यापूर्वी साकवाकडे जाणाऱ्या मार्गाची ग्रामपंचायतींनी रेकॉर्ड २३ मध्ये नोंद करणे आवश्यक असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. अन्यथा साकवाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविता येणार नसल्याची कल्पनाही त्यांनी दिली.

यावेळी कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी तत्परतेने मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन शिष्टमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा