आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये ५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ उपक्रमातून नागरिकांच्या अंगणातच लावली जाणार झाडे; रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीही युवासेनेचा पुढाकार
कुडाळ :
कुडाळ शहराचा झपाट्याने विकास आणि विस्तार होत असताना पर्यावरणीय समतोल राखण्याच्या उद्देशाने युवासेनेतर्फे एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरात तब्बल ५ हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असून, भूजल पातळी वाढवणे आणि वाढते प्रदूषण रोखणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमांतर्गत शिवसेनेच्या माध्यमातून ‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ ही अभिनव योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी विशेष क्यूआर कोड तयार करून तो नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. नागरिकांनी हा क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या परिसरासाठी आवश्यक असलेल्या वृक्षाची नोंदणी करायची असून, त्यानंतर शिवसैनिक थेट संबंधितांच्या अंगणात जाऊन वृक्षारोपण करणार आहेत.
भूजल पातळी वाढविण्यास आणि पर्यावरण संवर्धनास हातभार लावणाऱ्या बेल, आवळा, करंज, मोहजनी, बहावा, चिंच, कुसुमी आणि कांचन यांसारख्या वृक्षांची निवड या मोहिमेसाठी करण्यात आली आहे.
“पूर्वीच्या पिढ्यांनी जपलेल्या पर्यावरणामुळे आज आपण चांगले जीवन जगत आहोत. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी आपणही काहीतरी देणे लागतो, या भावनेतून हा उपक्रम राबविला जात आहे,” असे मंदार शिरसाट यांनी सांगितले.
वृक्षलागवडीबरोबरच पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी युवासेनेने दोन महत्त्वाच्या मागण्या पुढे केल्या आहेत. कुडाळमधील शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार आहे. तसेच नवीन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट सक्तीने लागू करावी, अशी मागणी नगरपंचायतीकडे करण्यात येणार आहे.
याशिवाय, ज्या घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था कार्यान्वित आहे, त्यांना घरपट्टीत १० टक्के करसवलत देण्याबाबतच्या शासन निर्णयाची कुडाळमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या पर्यावरण मोहिमेचा शुभारंभ माजी खासदार विनायक राऊत , अरुण दुधवडकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कुडाळ परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.
