You are currently viewing आंगणेवाडीतील निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेत जय गणेश महिला कबड्डी संघ मालवण विजेता
Oplus_16908288

आंगणेवाडीतील निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेत जय गणेश महिला कबड्डी संघ मालवण विजेता

आंगणेवाडी महिला संघ उपविजेता; उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव, राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा विकास मंडळाचा निर्धार

मालवण / मसुरे (प्रतिनिधी) :

आंगणेवाडी विकास मंडळ, आंगणेवाडी आणि आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेत जय गणेश महिला कबड्डी संघ, मालवण यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. तर आंगणेवाडी महिला कबड्डी संघाने उपविजेतेपद मिळविले.

या स्पर्धेत एस. ए. फाउंडेशन महिला कबड्डी संघ, मालवण यांनी तृतीय क्रमांक तर यंग स्टार महिला कबड्डी संघ, कणकवली यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. यशस्वी संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

निमंत्रित महिला संघांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही विशेष सन्मान करण्यात आला. विनिता साठे (आंगणेवाडी संघ), साक्षी निकम (यंग स्टार कणकवली), रिद्धी हडकर (जय गणेश मालवण) आणि दुर्वा राणे (एस. ए. फाउंडेशन मालवण) यांची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. त्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ही स्पर्धा मॅटवर खेळविण्यात आली होती. स्पर्धेसाठी पंकज राणे, प्रथमेश आढाव, प्रियंका कोरगावकर, महेश सावंत, हरिश्चंद्र साळुंखे, नितीन हडकर आणि सुरज परब यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास आंगणेवाडी विकास मंडळाचे सचिव काका आंगणे, अनंत आंगणे, विद्या आंगणे, सिताराम उर्फ बाळा आंगणे, गजानन आंगणे, दत्तप्रसाद पेडणेकर, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू भरत आंगणे, सचिन आंगणे, तुषार आंगणे, बाळा आंगणे, तनुराज आंगणे, सोमा आंगणे, कुणाल आंगणे, प्रतीक आंगणे, रोहित आंगणे, सागर आंगणे, प्रथमेश आंगणे, दिनेश आंगणे, देवा आंगणे, तन्मय आंगणे, गणेश आंगणे, गोविंद आंगणे, दीपक आंगणे, प्रमोद आंगणे, सुधीर आंगणे, विशाल आंगणे, भास्कर आंगणे, बाबा आंगणे, सतीश आंगणे, समीर आंगणे, राजू आंगणे तसेच आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्यकर्ते, आंगणेवाडी स्पोर्ट्स संघाचे खेळाडू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना काका आंगणे यांनी सांगितले की, या निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भविष्यात आंगणेवाडी येथे कबड्डीसह विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील विविध खेळांतील खेळाडूंना पुढे आणण्यासाठी आंगणेवाडी कुटुंबीय आणि आंगणेवाडी विकास मंडळ सातत्याने प्रयत्नशील राहील.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी केले. यावेळी जय गणेश मालवण संघाची खेळाडू रिद्धी नितीन हडकर हिने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल तिचा अनंत आंगणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा आंगणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू आणि संघ व्यवस्थापकांसाठी आंगणेवाडी कुटुंबीयांच्या वतीने मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा