पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही
प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर १६० मीटर लांबीचे नवे शेड उभारणार; प्रवासी सुविधांमध्ये होणार मोठी वाढ
कणकवली :
मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कणकवली रेल्वे स्थानकातील दोन महत्त्वाच्या प्रवासी सुविधा मार्गी लागल्या आहेत. कणकवली स्थानकातील सरकता जिना आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर १६० मीटर लांबीच्या नव्या शेडच्या उभारणीला देखील मंजुरी मिळाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. स्थानकावरील विविध प्रवासी सुविधांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकण रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली.
गेल्या महिन्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. अल्पावधीतच हे काम पूर्ण करण्यात आले असून आता हा जिना प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून ताशी सुमारे सहा हजार प्रवाशांची वाहतूक क्षमता या सरकत्या जिन्याची आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० मीटर लांबीच्या नव्या शेडची उभारणी करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून लवकरच कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. हे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे कणकवली रेल्वे स्थानकातील दोन महत्त्वाच्या सुविधा मार्गी लागल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
