सावंतवाडी :
गेली कित्येक वर्षे आरोस गावातील सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांना वीज, शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते या मूलभूत गरजांसाठी वणवण करावी लागत आहे. याच महिन्यात कळंगुटकरवाडी ग्रामस्थानी महाराष्ट्र दिनी आपल्या हक्कासाठी रस्त्यासाठी घेतलेला उपोषणाचा पवित्रा ताजा असतानाच आता
दिनांक २५/०५/२०२६ रोजी गावातील मुख्य रस्त्याची झालेली दुरावस्था, गावातील पाणी टंचाई विजेचा चाललेला लपंडाव असे अनेक प्रश्न घेऊन उबाठा शिवसेना पक्षाचे न्हावेली मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघाचे विभागप्रमुख श्री गुरुनाथ साबाजी नाईक व ग्रामस्थानी भेट घेउन निवेदना द्वारे ग्रामस्थाना भेडसावत असलेल्या अनेक प्रश्नांबाबत आरोस ग्रामपंचायतचे प्रशासक श्री शंकर नाईक व ग्रामसेवक श्री कुबल यांना जाब विचारत हे रखडलेले प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली आहे. यावेळी आरोस गावातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल ग्रामस्थानी विचारले असता प्रशासक व ग्रामसेवक यांनी मुख्य रस्ता, माऊली मंदिर रस्ता यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले .
तसेच गिरोबावाडी येथील श्री प्रसाद नाईक यांच्या घराशेजारील विहीर तात्काळ साफ करून त्या वाडीतील लोकांची पाण्याची होणारी गैरसोय तात्काळ दूर करण्याचे आश्वासन दिले.तसेच नाबरवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीची दुरुस्ती केल्याचे ग्रामसेवक श्री कुबल यांनी सांगितले. यावेळी गुरुनाथ नाईक यांच्याबरोबर आरोस ग्रामपंचायत उपसरपंच श्री प्रसाद नाईक, यशवंत सावंत,गणपत नाईक, प्रकाश परब, लक्ष्मण सावंत व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोस गावातील अनेक तरुण – तरुणी नोकरीनिमित्त गोव्यातून ये जा करत असतात. गावातील रस्त्यांना खड्डे पडून झालेल्या दुरावस्थेमुळे त्यांच्या व या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
निकृष्ट वीज वितरणामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावरही परिणाम होत असल्याचे नाकारता येत नाही.
आज भारत देश विकसित राष्ट्र घडविण्याची स्वप्ने पाहत असताना आरोस गावची अशी दयनीय अवस्था झालेली असून नागरिकांना मूलभूत गरजांसाठी वणवण करावी लागत असल्याने उभाठा शिवसेनेचे विभाग प्रमुख यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले.
