वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उद्या सकाळी १०.३० वाजता होणार निदर्शने
कुडाळ :
पेट्रोल, डिझेल तसेच गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी, २७ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असल्याची माहिती तालुका ठाकरे शिवसेनेकडून देण्यात आली.
सतत वाढत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींविरोधात जोरदार निदर्शने करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
या आंदोलनासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, लोकप्रतिनिधी तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
