You are currently viewing मी ठीक आहे
Oplus_16908288

मी ठीक आहे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मी ठीक आहे…..*

 

मी ठीक आहे म्हणती, म्हणती उगीच सारे

निम्याहूनी अधिक असतात बंद दारे

हे नको नको बाई बंधने नशिबात

स्त्री जन्म देऊनी तो त्यानेच केला घात..

 

मांडावे कुठे गाऱ्हाणे? झाकली ठेवा मूठ

अंतरात वणवा पेटे प्रश्न ते तिनशे साठ

ना येथली रहाते नारी न तेथली ती

चारी कडून “कारा”असतात उंच भिंती..

 

बाल्यात साखळ्या त्या पायात रूणझुण

बघता बघता बने ती दाराची बंद खूण

परणून( लग्न करून) येता गृही स्वामीच मालक तो

अदृश्य त्या छडीने सदैव नाचवितो..

 

चुली घरोघरी त्या मातीच्या सारख्या त्या

ओठात बंद असती मुठीत ठेवती त्या

कुणी न सुटली पहा सामोरी जाते रोज

सांगू कुणा म्हणे ती, भोगते नित्य भोग..

 

इतिहास साक्षी आहे, अजूनही रडते नारी

पापणीत लेकरे ती धरते मनी उभारी

मी ठीक आहे म्हणते नयनात दाटे पूर

द्यावा कुणास दोष नियतीच आहे क्रूर…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा