*पारिजातचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन सुफल संपन्न*
नवी मुंबई / सानपाडा:
पारिजात साहित्य परिवार आयोजित दुसरे साहित्य संमेलन सानपाडा नवी मुंबई येथे रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. “तुमच्याकडे सिद्धी असेल तर प्रसिद्धी तुम्हाला शोधत येते”. लिहित रहा लोकांकडून पुरस्कारांची, प्रतिसादाची अपेक्षा करू नका. तंत्र आलं म्हणजे गझल लिहिली असं नाही, तर गझलेत तंत्र शुद्धता असेल, तंत्रावर प्रभुत्व असेल तरच गझल सरस ठरते असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष गझलकार डॉ अविनाश सांगोलेकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक गझलकार डॉ इक्बाल मिन्ने, प्रमुख अतिथी गझलकार डॉ. ए के शेख, गझलकारा प्रा सुनंदा पाटील, गझलकारा उर्मिला बांदिवडेकर, लेखिका राजश्री भावार्थी, डॉ.अशोक पाटील, स्वागताध्यक्ष सुनील छाचेड, प्रा.एस.यू. मुल्ला, शबाना मुल्ला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. यू. मुल्ला यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. उपस्थितांचे स्वागत संचालिका शबाना मुल्ला यांनी अर्चना देवधर लिखित सुमधुर स्वागत गीताने केली. शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवरांचे आयोजकांनी स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी मनोगतामध्ये कविता, गझल विषयी अतिशय सुरेख मार्गदर्शन केले व पारिजात समूहाच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी मुल्ला दाम्पत्याचे कौतुक केले. राजश्री भावार्थी यांनी साहित्य लेखन विषयी सुंदर विचार मांडले. सोशल मीडियावर साहित्य टाकण्याची असलेली घाई आणि तिथे मिळत असलेल्या लाईक्स यामुळे अनेकजण साहित्यिक झाल्याचे समजतात. परंतु साहित्यिक म्हणजे काय..? याचं त्यांनी सविस्तर विवेचन केले. संमेलनाचे प्रमुख अतिथी आदरणीय गझलकार ए के शेख यांनी शबाना मुल्ला यांच्या दुसऱ्या साहित्य संमेलन आयोजनाचे तोंड भरून कौतुक केले. एखादा लग्न सोहळाच असल्यासारखे असते आयोजन हे शबाना मुल्ला यांच्या बंधुराजांचे शब्द अगदी खरे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दोन गझल सादर केल्या. यामध्ये सर्वांच्या आग्रहाखातर *गरिबाच्या लग्नात नवरी गोरी काय काळी काय* ही गाजलेली गझल ऐकवली आणि शबाना मुल्ला यांचा पुढील संमेलनात गझलसंग्रह प्रकाशित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
पारिजातच्या संमेलनाचे खास वैशिष्ट्य ठरले ते पुस्तक प्रकाशन सोहळा. यावेळी शबाना मुल्ला यांचा वृत्तबद्ध काव्यसंग्रह, उर्मिला बांदिवडेकर यांचे ११ गझलसंग्रह आणि १ दिवाणचे प्रकाशन गझलनंदा सुनंदामाई पाटील यांच्या शुभहस्ते तर डॉ.शरयू शहा यांचे ५ गझलसंग्रह १ दिवाणचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष डॉ.अविनाश सांगोलेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्व पुस्तके सिराज शिकलगार यांच्या बाजीगर प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. यावेळी बाजीगर प्रकाशनचे प्रकाशक गझलकार सिराज शिकलगार यांनी “जेव्हा आपण आपल्या चुका शोधतो तेव्हा आपल्याही चुका लक्षात येतात…इतरांचे पुस्तक प्रकाशन करताना आपल्यालाही नवीन काही शिकता येतं” असे विचार प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते समूहाच्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या साहित्यिकांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
*निमंत्रितांचे काव्यसंमेलन एक पर्वणीच*
सकाळच्या पहिल्या सत्रात निमंत्रितांचे गझलसंमेलन पार पडले. यात प्रामुख्याने शबाना मुल्ला, सिराज शिकलगार, ऊर्मिलामाई बांदिवडेकर, अनंत जोशी, सैद चांद तरोडकर, डॉ इक्बाल मिन्ने, डॉ.सुभाष कटकदौंड, आप्पा ठाकूर, नंदिनी काळे, राजश्री भावार्थी मनिषा पाटील रायजादे यांनी भाग घेतला. आप्पा ठाकूर यांची आईचा सातबारा ही रचना प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. त्यांची गझल रचना देखील भावस्पर्शी होती.
*मेल्यावर माझ्या दारी मरणाचा उत्सव व्हावा*
*हा देह गरजवन्तांना वा किडमुंग्यांना द्यावा…*
सारस्वतांच्या मागणीनुसार आप्पा ठाकूर यांनी विठ्ठलाला सूचना करणारी प्रसिद्ध गझल सादर केली.
सिराज शिकलगार, सैद चांद तरोडकर, उर्मिलामाई बांदिवडेकर यांनी मनाचा वेध घेणाऱ्या गझलांचे सादरीकरण केले. निमंत्रितांच्या गझलसंमेलनाचे सूत्रसंचालन मनिषा पाटील रायजादे यांनी केले.
*चुकांमधून शिका आणि त्यातून चांगले काहीतरी करा…: उद्घाटक गझलकार डॉ.इक्बाल मिन्ने*
चुकांमधून शिका आणि त्यातून चांगले काहीतरी करा… दुध खराब झाले तर त्याचे दही बनवता येते, दही खराब झाले तर चिझ बनवता येते आणि चिझ खराब झालेच तर त्यापासून वाईन बनवता येते… आणि दुधापेक्षा दही, दहापेक्षा चिझ आणि चिझ पेक्षा वाईन महाग असते. चुकांमधून सुद्धा जी नवी निर्मिती होते ती मौल्यवान असली पाहिजे. एकमेकाला वाचायला शिका, दुसऱ्यांचे साहित्य वाचलात तर त्यातून अधिक चांगले काहीतरी गवसते. पुस्तके विकत घेऊन वाचा तरच त्यांचं मोल कळतं. माणसाला स्वतःसाठीच नव्हे तर दुसऱ्यासाठी सुद्धा जगायला शिकले पाहिजे असे मार्गदर्शनपर विचार त्यांनी मांडले. एकाचवेळी १८ गझलसंग्रह, २ दीवान आणि १ काव्यसंग्रह प्रकाशित करणाऱ्या बाजीगर प्रकाशनचे प्रकाशक गझलकार सिराज शिकलगार, गझलकारा उर्मिला बांदिवडेकर, गझलकारा डॉ.शरयू शहा यांचं त्यांनी कौतुक केलं आणि गझलेचे काही शेर सादर केले.
*वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते*
*पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते*
*आई असते म्हणुनी सारे सोसत जाते*
*रातरातभर जागत जाणे सोपे नसते*
दुसऱ्या सत्राची सुरुवात ज्येष्ठ गझलकारा प्रा.सुनंदा पाटील गझलनंदा यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. यावेळी मुलाखतकार नंदिनी काळे यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी शाळेत असताना लिहिलेला निबंध वाचून ही मुलगी पुढे लेखिका होणार असे मुख्याध्यापकांनी सांगितले होते इथंपासून आता गझलकारा म्हणून नावलौकिक मिळविण्यापर्यंतच्या संपूर्ण साहित्यिक प्रवासाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला आणि सुरेश भटांनी बहाल केलेल्या गझलनंदा या नावा मागील कहाणी देखील सांगितली. आपण कितीतरी गझल कार्यशाळा आजपर्यंत घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
अखेरच्या सत्रात तब्बल ३५ कवी कवयित्री दिलखुलास कविता, गझलांचे प्रभावी सादरीकरण करून कार्यक्रमाचा उत्तरार्ध गोड केला. संमेलनाचे अध्यक्ष गझलकार सिराज शिकलगार यांनी गझल तर संयुक्त अध्यक्ष अनंत जोशी यांनी स्वर्गातील सुरेख रचना सादर करून हास्य खुलवले. सर्व सहभागी सादरीकरण करणाऱ्या सारस्वतांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समूहाचे मार्गदर्शक प्रा. एस. यू मुल्ला यांनी केले. या संमेलनासाठी चांदा ते बांदा पर्यंतचे साहित्यिक सारस्वत सहभागी झाले होते.
या कवींनी भरले रंग
कवयित्री भावना काळे, अशोक बी कांबळे, मेहमूदा शेख (गुलपरी), वनिता पाटील, ऋचा पारेख, दीपा तळकर, वाणी केरकलमट्टी, आसावरी जाधव, डॉ अलका कुलकर्णी, मंगला ढगे, सानिका दिनेश कदम, दीपा पराडकर, प्रतिभा कुलकर्णी, सविता कांबळे, कल्पना देवण, शशिकला अभंगराव, रेखा सोनावणे, श्रीकांत धारकर, अनिसा सिकंदर, माधुरी बर्वे, पल्लवी भागवत, शोभा करंडे, सुनंदा अमृतकर, तेजश्री कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी, अर्चना मायदेव, पाकिजा आत्तार, दीपक पटेकर, निशा दळवी, अनघा सावर्डेकर विभावरी आमोदकर, आणि अवंतिका महाडिक
