You are currently viewing कुटुंब माझे

कुटुंब माझे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कुटुंब माझे*

 

(वृत्त: हरिप्रिया)

 

आई बाबा, ताई दादासंगे बनते कुटुंब माझे

अंगणातल्या जुईफुलांच्या सवेच सजते कुटुंब माझे

 

पिढी मागची कायम धरते छत्र मायेचे साऱ्यांवरती

येत्या जात्या अतिथीसंगे सदैव रमते कुटुंब माझे

 

गोठ्यामधली गाय वासरे हंबर देती सांज सकाळी

मोत्या, राघू साऱ्यांना मग लळा लावते कुटुंब माझे

 

कुणीच येथे नोकर नसतो येथे असती समान सारे

पैशापेक्षा माणसातली नाती जपते कुटुंब माझे

 

मायपित्यांचे ओझे झाले वाढू लागली कुटुंब केंद्रे

कोसळताना घरे सभोती मनात रडते कुटुंब माझे

 

श्रीनिवास गडकरी

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा