*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम लघुकथा*
*आभास*
अंगणातल्या झोपाळा त्याच्याबरोबर हेलकावे खात होता, त्याला लावलेले घुंगरु
प्रत्येक हेलकाव्याबरोबर रुणझुणत होते. सारे त्याच्या डोळ्यासमोर तरळत होते.
एक सुंदरसा बगीचा, शाल्मली ची आवडती फुलझाडे बहरली होती, रोज तो तिची आवड जपत होता, झाडांना खतपाणी घालतांना तिच्याशी बोलत होता.
सारे दृश्य डोळ्यासमोर येत होते, खूप आठवणी लाटल्या होत्या, अगदी दोघांचे लग्न झाल्यापासून, नोकरी दोघांची कष्ट, मेहनत, हसणे, रुसणे फिरणे सारे आठवत होते.
मुलीचा जन्म, आनंदोत्सव, नंतर तीन वर्षांनी मुलगा सर्व कसं छान चालले होते, मुलांची शिक्षण झाली, नोकरी, लग्न सारे व्यवस्थित पार पडले. मुलगा परदेशी गेला, मुलगीही
चांगल्या सुखवस्तू घरात. सुख म्हणजे काय हे अगदी मनापासून आठवत दोघेही खूप खुश होते.
आणि अचानक एके दिवशी शाल्मली अशीच हसत खेळत वावरत होती, दोघेही गप्पागोष्टी करत होते. क्षणार्धात ती गहिवरले, कसनुसं करु लागली, तो घाबरला, डॉ क्टरांना फोन केला, डॉ क्टरांना येईपर्यंत सर्व संपले होते. तो अवाक झाला, पुढील सारे मित्र मंडळ, नातेवाईकांनी सावरले.
तेव्हा पासून तो असाच भिरभिरत फिरत असे, नातेवाईकांनी कालांतराने त्याची सारी सोय केली, मुले आपापल्या घरी गेली, त्याला कुठेही जायचे नव्हते. शाल्मली च्या आठवणीत तो दिवस काढत होता.
संध्याकाळ व्हायला आली होती, राधाबाई स्वयंपाक पाण्याचे उरकून घरी गेल्या होत्या. त्यादिवशी गोविंदा ही सारी कामे लवकर उरकून घरी गेला होता.
त्या एवढ्या मोठ्या बंगल्यात तो एकटाच होता,
खूप आवडीने सुंदर सजवलेला बंगला, आवडत्या वस्तू, चांगल्या सुखसोयी त्याने आणि त्याच्या पत्नीने हौसेने आणलेली, एकमेकांच्या आवडीने घेतलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या नजरेसमोरून तरळत होती. शाल्मली ची आठवण तिचे हसरे रुप, तिचे सौंदर्य, तिचा राग रुसवा सारे आताच घडल्यासारखे त्याच्या नजरेसमोरून तरळत होते.
आणि अचानक त्याला भास झाला, लांब शेपट्याला झोके देत ला डिक सुरात गुणगुणत शाल्मली त्याच्या जवळ आली.
प्रेमाने त्याचा हात हातात धरुन म्हणाली “येताय ना, आपण जरा बगिच्यात फिरुन येऊ. ”
तो किंचित सा हसला त्याला काहीच कळले नाही, तिचा हात हातात घेऊन तो तिच्याकडे पहात राहिला,
एकटक…..
हा आभास होता की सत्य त्याला कळेना. …..
आणि दुसर्याच क्षणी तो शाल्मली च्या खांद्यावर????
कोसळला.
त्यांच्या स्वप्नपूर्ती बंगल्यात आता फक्त आभास होता.
पैंजणाची रुणझुण, गाण्याची गुणगुण, झोपाळ्यावरचे झोके
सारे तिथेच थांबले होते.
होता फक्त आभास.
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर.
