*मिरेखन शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘खेळ पैठणीचा – सन्मान नारी शक्तीचा’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*अनिशा कोळापटे ठरल्या विजेत्या; विद्या देसाई व संजना सावंत उपविजेत्या*
*बांदा*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेगवे मिरेखनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा – सन्मान नारी शक्तीचा’ या आगळ्यावेगळ्या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद लाभला. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, तसेच महिलांमध्ये आत्मविश्वास, एकोपा आणि आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साह, आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणात पार पडला. शाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रममाचे उद्घाटन माजी शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसकर यांच्या हस्ते झाले.यावेळी जमीन मालक सावळाराम सावंत, ज्ञानेश्वर सावंत व धाकू सावंत यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील विद्यार्थी व शाळेला लाभलेले आजी -माजी शिक्षक यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजिका अक्षता गवस, ग्रामपंचायत सदस्य रुपाली देसाई, प्रगती देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश कोकरे, उपाध्यक्ष राजन सावंत,मुख्याध्यापक आनंद कोळापटे ,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष अक्षय सावंत, उपाध्यक्ष धोंडू कोकरेआदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करत शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
स्पर्धेसाठी गावातील तसेच परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध खेळ, मनोरंजक फेऱ्या आणि कौशल्यपूर्ण सादरीकरणांमुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सहभागी महिलांनी खेळांचा मनमुराद आनंद घेत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. उपस्थित प्रेक्षकांनीही महिलांना उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
स्पर्धेत अनिशा कोळापटे यांनी उत्कृष्ट आत्मविश्वास, कौशल्य आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. विद्या देसाई आणि संजना सावंत यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद मिळवले. विजेत्या आणि उपविजेत्या स्पर्धकांचा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सरपंच राजन देसाई, उपसरपंच मंगेश देसाई आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पैठणी साड्या देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या पैठणी ग्रामपंचायत सरपंच राजन देसाई,सदस्य राजेश देसाई,प्रगती देसाई व मिरेखन येथील सुहास सावंत यांनी पुरस्कृत केल्या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जे. डी. पाटील यांनी आपल्या ओघवत्या, विनोदी आणि प्रभावी शैलीत केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आबाजी सावंत, मुख्याध्यापक आनंद कोळापटे तसेच सहकारी शिक्षक सौरभ खोत यांनी मोलाचे सहकार्य केले. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आणि सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मालू लांबर,भागू लांबर,बाबू कोकरे, गंगाधर कोकरे,शिदू लांबर,रामू लांबर, उमेश सावंत, संतोष सावंत, संदीप सावंत, नंदू कोकरे, बाबाजी सावंत , विठ्ठल सावंत, प्रदिप देसाई व सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
