You are currently viewing १६ ऑगस्टला कुडाळमध्ये ‘प्रोजेक्ट संजीवनी’अंतर्गत मोबाइल पॅथॉलॉजी व्हॅनचे लोकार्पण

१६ ऑगस्टला कुडाळमध्ये ‘प्रोजेक्ट संजीवनी’अंतर्गत मोबाइल पॅथॉलॉजी व्हॅनचे लोकार्पण

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आता जवळच रक्त तपासणी सुविधा

कुडाळ : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरातच दर्जेदार, विश्वासार्ह व परवडणाऱ्या रक्त तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मानव साधन विकास संस्था, मुंबई यांच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी – एक थेंब… एक आशा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत मोबाइल पॅथॉलॉजी व्हॅन सुरू करण्यात येत आहे. या व्हॅनचा लोकार्पण सोहळा रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता एमएसव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन, अणाव येथे होणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना रक्त तपासणीसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. अपुरी वाहतूक व्यवस्था, प्रवासाचा वाढता खर्च आणि वेळेचा अपव्यय यामुळे अनेकांना आवश्यक वैद्यकीय तपासणी करून घेण्यात अडचणी येतात. ही गरज लक्षात घेऊन मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा सुरेश प्रभू यांनी ‘प्रोजेक्ट संजीवनी’ची संकल्पना मांडली आहे.

मोबाइल पॅथॉलॉजी व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांच्या जवळच्या परिसरात आवश्यक रक्त तपासण्या उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यामुळे ग्रामीण नागरिकांचा प्रवास, वेळ आणि अतिरिक्त खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ONGC आणि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य तपासणी सेवा पोहोचविण्यास मोठी मदत होणार आहे.

लोकार्पण सोहळ्यास माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री, भारत सरकार तथा मानव साधन विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्तरीय सामाजिक स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक संस्था, ग्रामस्तरीय सामाजिक स्वयंसेवक तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या सामाजिक उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती मानव साधन विकास संस्थेचे विश्वस्त डॉ. शरद सावंत, श्री. विलास हडकर, एमएसव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड एज्युकेशनचे प्रमुख योगेश प्रभू आणि एम.डी. पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय सावंत यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा