You are currently viewing प्रकाशाचे दान

प्रकाशाचे दान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुशिला हेमचंद्र पिंपरीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रकाशाचे दान*

 

ज्योतिबा, बाबासाहेब दिले जगण्याचे अभियान

काळोखातल्या आयुष्याला दिले,प्रकाशाचे दान ||धृ||

 

जातीभेद मुरलेला, जाळला कुविचारांचा कचरा

हक्क शिक्षणाचा सर्वांना, अज्ञान आमुचे विसरा

मक्तेदार बुध्दीवादाचे, तयांना दिधले आव्हान

काळोखातल्या आयुष्याला…..|१|

 

दु:ख दारिद्र्य गुलामी,दुर्गम डोंगराआडून.

सूर्य तेज झळकले, ज्योती भीम ता-यांकडून

दिली प्रेरणा दीन दलितांना, उडण्याचे अवसान |२|

 

विद्येविना अनर्थ, मतिविना व्यर्थ खचले सारे

अज्ञान, छळवाद सारण्या, फुंकले शिक्षणाचे वारे

ज्योतिबांचा सत्यशोधक, भीमरावांचे अभयदान

काळोखातल्या आयुष्याला….|३|

 

विचारगंगा ज्योतिबांची, केली प्रवाही भीमरावांनी

मिळवून शिष्यवृत्ती, सिध्द केले अगणित पदव्यांनी

जातीभेद मिटविण्या दिधला, एकजूट मंत्र महान

काळोखातल्या आयुष्याला…..|४|

 

समाजवादी क्रांतीकारक, ज्योतिबा लोकनायक महात्मा

न्यायप्रिय बाबांनी जागविला, मानवतेचा आत्मा

भारतीय संविधान कर्ता श्रेष्ठ, भारत रत्न महा सन्मान

काळोखातल्या आयुष्याला….|५|

 

दुमदुमले नाव अखिल विश्वात, माणसातला देव

लोकशाही संविधान बोलके, हक्क कर्तव्याची ठेव

जोवरी सूर्य चंद्र, गाऊ ज्योतिबा भीवरावांचे गान

काळोखातल्या आयुष्याला, दिले प्रकाशाचे दान |६|

 

सुशीला हेमचंद्र पिंपरीकर, नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा