You are currently viewing तुझ्यासाठी आंबे आणले हापूस पायरी

तुझ्यासाठी आंबे आणले हापूस पायरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. सरिता परसोडकर लिखित अप्रतिम गवळण*

 

*तुझ्यासाठी आंबे आणले हापूस पायरी*

 

थांब कृष्णा अरे थांब कान्हा नको फिरू माघारी

तुझ्यासाठी आणले आंबे मी हापूस पायरी..

 

फिटली नाही का हौस तुझी खाऊन दही दूध लोणी

अंधारात उभी एकटी मी मला पाहिला ना कोणी

येना लवकर मला जाण्या उशीर होईल रे घरी

 

तुझ्यासाठी आणले आंबे मी हापूस ,पायरी..!!१!!

 

काय जादू केली तुझ्यावर त्या गोकुळात जाणे

उठता उठता बसता ऐकतो गवळणी चे गाऱ्हाणे

ऐकत नाही यशोदेचा मार तुला पडतो तरी

तुझ्यासाठी आणले आंबे मी हापूस पायरी..!!२!!

 

कलियुगातली सरीता मी रे आहे साधी भोळी

चाखु देना रोजच अमृतमय तुझ्या नामाची गोळी

नको तुझा विरह फक्त बरसू दे हृदयी प्रेमसरी

 

तुझ्यासाठी आणले आंबे मी हापूस ,पायरी..!!३!!

 

दर्शन झाले कान्हा तुझे आता जा सुखे घरी

वेडी तुझी भक्त मी सदा राहू दे तुझ्या अंतरी

संकटात धावून येशील एवढे वचन दे तरी

तुझ्यासाठी आणले आंबे मी हापूस, पायरी..!!४!!

 

सौ सरिता परसोडकर पुसद✍🏻

प्रतिक्रिया व्यक्त करा