देवगडात ८ कोटींच्या अंबरग्रीसचा मोठा साठा जप्त; तिघे संशयित ताब्यात
तळेबाजार येथे वन विभागाचा सापळा यशस्वी; ८.८ किलो ‘ब्लू व्हेल उलटी’ हस्तगत
देवगड
देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे वन विभागाने रचलेल्या सापळ्यात तब्बल ८ किलो ८०० ग्रॅम वजनाचे, सुमारे ८ कोटी रुपये किंमतीचे अंबरग्रीस (ब्लू व्हेल माशाची उलटी) जप्त करण्यात आले असून या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई ३० एप्रिल रोजी करण्यात आली.
योगेश गणपत करंजेकर (४२, रा. इळये), विष्णू धाकू धुरत (३३, रा. आनंदवाडी) आणि संतोष काशिराम नाडणकर (५६, रा. वरेरी) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेबाजार येथे अंबरग्रीस विक्रीसाठी काही इसम येणार असल्याची गुप्त माहिती सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाने बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला. संशयित विक्रीसाठी आले असता वन विभागाच्या पथकाने त्यांना मुद्देमालासह रंगेहात पकडले.
या प्रकरणी देवगड राऊंड गुन्हा क्र. डब्ल्यू एल ०१/२०२६ नुसार वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९, ४४, ४९, ४९ (बी) आणि ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेले अंबरग्रीस हे सुमारे ८.८ किलो वजनाचे असून त्याची अंदाजे बाजार किंमत ८ कोटी रुपये इतकी आहे.
ही कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डॉ. एस. के. लाड यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. पाटील, विविध वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी सहभागी होते.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिक माहिती असल्यास नागरिकांनी सावंतवाडी वन विभागाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
