You are currently viewing सिंधुदुर्गातील वंचित मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शोध मोहीम…

सिंधुदुर्गातील वंचित मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शोध मोहीम…

१ ते १० मार्च या कालावधीत सर्वेक्षण; शाळाबाहय, स्थलांतरीत व शाळेत अनियमित मुलांचा समावेश…

ओरोस
सिंधुदुर्ग जिल्हयात दिनांक १ ते १० मार्च २०२१ या दरम्यान शाळाबाहय, स्थलांतरीत व शाळेत अनियमित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्हयात दिनांक १ ते १० मार्च २०२१ या दरम्यान शोध मोहिम शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २३ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ नुसार वयोगट ३ ते १८ वयोगटातील प्रत्येक मुलास शाळेच्या पटावर नोंदणी व्हावी, नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. ऊसतोडणी, वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामांसाठी पाल्यांसह कुटुंबे स्थलांतरण करीत असल्याने वयोगट ३ ते १८ वयोगटातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशा स्थलांतरीत शाळाबाहय मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. १०० टक्के मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी एकत्रितपणे योग्य नियोजन करुन कृती करणे शालेय शिक्षण विभागाला अपेक्षित आहे.
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण विभागाकडून माहे जुन २०२० मध्ये कोव्हीड कालावधीत स्थलांतरीत मुलांचे सर्वेक्षण करण्यात आलेले होते. सदर स्थलांतरीत मुलांचे सर्वेक्षणामध्ये २८७५ मुले स्थलांतरीत होवून आलेली आढळली होती. तर याजिल्हयातून १२५ मुले स्थलांतरीत होवून गेलेली आढळलेली होती.
दि.२४,२५ व २६ नोव्हेंबर २०२० रोजी तीन दिवसीय शाळाबाहय मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये ८७ मुले शाळाबाहय व अनियमित असल्याचे आढळली. सदर मुलांना नजीकच्या शाळेत दाखल करण्यात आलेले आहे.
सन २०२०-२१ मध्ये दुसरे शाळाबाहय मुलांचे सर्वेक्षण दि.१ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी २०२१ चे शाळाबाहय मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये ४३ मुले शाळा बाह्य आढळली. सदर मुलांना नजीकच्या शाळेत दाखल करण्यात आलेले आहे.
दि.०१ ते १० मार्च २०२१ मध्ये होणाऱ्या शाळाबाहय, स्थलांतरीत व शाळेत अनियमित असलेल्या मुलांची विशेष शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक गावामध्ये जेवढी कुटुंबे रहातात त्या कुटुंबामध्ये इयत्ता बालवाडी ते इयत्ता १२ वी पर्यंत मुलांचे शिक्षण सुरु आहे किंवा नाही याचीही माहिती घेवून शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. हे या विशेष शोध माहिमेचे विशेष आहे.म्हणजेच जिल्हयातील प्रत्येक कुटुंबाला ,घरला भेट देवून माहिती घेतली जाणार आहे.
शाळाबाहय, स्थलांतरीत व शाळेत अनियमित असलेल्या मुलांची विशेष शोध मोहिम राबविण्याकामी महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, महिला बालविकास, एकात्मिक बालविकास योजना, कामगार व आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विकास सार्वजनिक आरोग्य आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. वयोगट ३ ते १८ वयोगटातील जी बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत. तसेच खाजगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनिअर केजीमध्ये जात नाहीत. अशा बालकांचा देखील शोध घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर, तालुकास्तर नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यादेखील करण्यात आलेल्या आहेत.
वयोगट ३ ते ६ अंगणवाडी, वयोगट ६ ते १४ प्राथमिक आणि वयोगट १४ ते १८ माध्यमिक शाळा या प्रकारातील शाळाबाहय विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे.विशेष शोध मोहिम घेण्यासाठी २५फेब्रुवारी २०२१ रोजी गटशिक्षणाधिकारी यांची बैठक घेण्यात आलेली आहे.तसेच २७ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हयातील सर्व विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची झूम मिटींगव्दारे बैठक घेण्यात आलेली आहे.सदर बैठकीत विशेष शोध मोहिम कशाप्रकारे राबविण्यात यावी याबाबत शिक्षणाधिकारी श्री.एकनाथ आंबोकर यांनी मार्गदर्शन केले.
सिंधुदुर्ग जिल्हयातील शाळाबाहय मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते १०मार्च या कालावधीत गाव, वाडया वस्त्या, शहर, रेल्वे व बस स्थानक, झोपडपट्टी यासह विविध ठिकाणी विशेष शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. याकामी अन्य शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य देखील घेण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रत्येक गावात व शहरात तसेच परिसरातील गजबजलेल्या वस्त्या, वाडया रेल्वेस्टेशन, बस स्थानक, ग्रामीण भागातील बाजार, गाव व शहराबाहेरची पालं, वीटभट्टया, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरीत कुटुंबे, झोपडया, फुटपाथ, रस्त्यावर भीक मागणारी बालके, लोककलावंतांची वस्ती, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, भटक्या जमाती, मागास, वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील वस्तीतील मुले-मुली यांची माहिती या विशेष शोध मोहिमेत घेण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =