कणकवली तालुक्यात भाजप पुरस्कृत उमेदवारांचा दणदणीत विजय
घोणसरीत प्रसाद राणे सरपंच; तळेरेत सागर डंबे, दारिस्तेत पूजा गुरव सदस्यपदी विजयी
कणकवली :
ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीअंतर्गत कणकवली तालुक्यातील तळेरे व दारिस्ते ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी, तसेच घोणसरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल बुधवारी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. या निवडणुकांमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवारांनी सर्व ठिकाणी विजय मिळवला.
कणकवली तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
घोणसरी ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रसाद राणे यांनी ५१७ मते मिळवत प्रतिस्पर्धी अनंत गुरव (४१० मते) यांचा १०७ मतांनी पराभव केला. नोटाला १० मते मिळाली. एकूण ९३७ मतदान झाले. या निवडणुकीसाठी शशिकांत भरसर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
तळेरे ग्रामपंचायत सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत सागर डंबे यांनी ३१२ मते मिळवत आदीत्य महाडीक (८३ मते) यांचा २२९ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. नोटाला ६ मते मिळाली. एकूण ४०१ मतदान झाले. येथे विजय पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
दारिस्ते ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीत पूजा गुरव यांनी १७० मते मिळवत प्रिती कदम (५३ मते) यांचा ११७ मतांनी पराभव केला. नोटाला १ मत मिळाले. एकूण २२४ मतदान झाले. येथे ओंकार सुतार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
निकाल जाहीर झाल्यानंतर कणकवली तहसील कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “खा. नारायण राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, तसेच “पालकमंत्री नितेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा उत्साह पाहायला मिळाला.
