संतोष साटविलकर संतप्त; संदेश सावंत, रूपेश कानडे यांच्यासह सदस्यांचा रोष – रोलर चोरी, शाळा दुरुस्ती व बिल प्रक्रियेवर प्रश्नांची सरबत्ती
सिंधुदुर्गनगरी :
जिल्हा परिषद बांधकाम विभागाची सभा आज विविध मुद्द्यांमुळे चांगलीच गाजली. सभापती संतोष साटविलकर व सदस्यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना अधिकारी व खातेमुख्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे सभागृहात वातावरण तापले आणि सदस्य आक्रमक होत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
सभापती निवडीनंतरची ही पहिलीच बैठक संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत, संजय बोबडी, रूपेश कानडे, दीपलक्ष्मी पडते, प्रमोद रावराणे, दीपक नारकर, वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, समिती सचिव तथा कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, मुख्य व लेखाधिकारी अभिजीत पिसाळ तसेच इतर अधिकारी व खातेमुख्य उपस्थित होते.
कुडाळ पंचायत समिती आवारातील बांधकाम विभागाच्या ताब्यातील रोलर चोरीचा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला. २००३ ते २००७ या कालावधीत या रोलरचा लिलाव झाल्याचे सांगण्यात आले, मात्र अलीकडील काळात तो रोलर गायब झाल्याचे समोर आले. तो नेमका कोणी नेला, याबाबत प्रशासनाकडे ठोस माहिती नसल्याने सदस्य संतप्त झाले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व याबाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असे निर्देश सभापती साटविलकर यांनी दिले.
सदस्य संदेश सावंत यांनी जिल्ह्यातील नादुरुस्त शाळा इमारतींचा मुद्दा उपस्थित केला. मात्र खातेमुख्यांकडून स्पष्ट माहिती न मिळाल्याने सर्व सदस्य आक्रमक झाले. पावसाळा तोंडावर असताना शाळांच्या दुरुस्तीबाबत माहिती नसणे गंभीर असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले.
याशिवाय बांधकाम विभागातील बिल मंजुरी प्रक्रिया, फाईलची हालचाल आणि विलंब यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. बिल मंजूर होण्यासाठी किती कालावधी लागतो, वित्त विभागाकडून फाईल परत का येते, याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले. या सर्व मुद्द्यांवर अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, सभागृहातील मायक्रोफोन व एसी व्यवस्था खराब असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. प्रशासन असताना देखील या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या सर्व घडामोडींमुळे बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील बैठकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सभापती साटविलकर यांनी प्रशासनाकडून बांधकाम विभागाने केलेल्या कामांची यादी सादर करण्याचे आदेश दिले.
