जगन्नाथ मेस्त्रीसह दयानंद कदम, आग्रेल डिसोझा, योगेश तावडे व सिद्धेश मराठे ताब्यात; १.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
कुडाळ :
तालुक्यातील निरखे-सुतारवाडी येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर बंदूक निर्मिती कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी आणखी चौघांना ताब्यात घेत अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत यापूर्वीच संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री (वय ६६, रा. निरखे सुतारवाडी) याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी दयानंद सोनू कदम (वय ३३, असरोंडी), आग्रेल मार्शल डिसोझा (वय ३२, भडगाव), योगेश राजाराम तावडे (वय २८, ओरोस) आणि सिद्धेश चंद्रकांत मराठे (वय २९, कडावल) यांना अटक केली.
सोमवारी रात्री टाकलेल्या धाडीत पोलिसांनी ३ तयार बंदुका, ६ बॅरल तसेच बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ४ लाकडी बट, ६ लोखंडी बॅरल, वेल्डिंग मशीन, ग्राइंडर व इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
निरखे-सुतारवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध शस्त्रनिर्मिती सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ वाजता छापा टाकण्यात आला.
या प्रकरणी मुख्य आरोपी जगन्नाथ मेस्त्री याच्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी गुरुदास पाडवे करीत आहेत.
