*ज्येष्ठ लेखक श्री अरुण कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*लोपला सूर आशेचा*
“भोगल्या दुःखाला सुख” म्हणून आयुष्य जगत राहिलेल्या आशा मंगेशकर पृथ्वीलोक सोडून स्वर्गलोकातील गंधर्व दरबारात आता रुजू झाल्या आहेत
आशाताईंच्या आवाजातून नेहमीच शुभ्र चांदणे पाझरत असायचे. “आगे भी जाने न तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही इक पल है ” हे त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होते. प्रत्येक क्षण त्यांच्या दृष्टीने चैतन्याचा झरा होता. आशाताईंचे हसरे फोटो खूप सापडतील, पण गंभीर फोटो मिळणं दुर्मीळच. त्या कायमच “प्रेझेंटेबल” असत. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्र हे “परफॉर्मिंग आर्ट” होते. आशाताईंच्या वागण्यात विलक्षण जिव्हाळा आणि सहजता असायची. लतादीदींबद्दल लोकांना आदर असायचा, मात्र तेवढीच भीतीही वाटायची. उलट आशाताई साध्या कामगारांमध्येही सहजतेने मिसळत. इतक्या साध्या की, सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसलेच्या लग्नावेळी वह्राडाबरोबर रेल्वेच्या दुसर्या वर्गाने त्या पुण्याला आल्या होत्या. साखरपुड्यापासून वरातीपर्यंत मोठ्या बहिणीसारख्या त्या उभ्या होत्या. इतक्या महान कलाकाराच्या वागण्यामध्ये इतका साधेपणा दुर्मीळच म्हणावा लागेल.
रुचकर, स्वादिष्ट पदार्थ, मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी, त्याचा त्या मस्त आस्वाद घ्यायच्या. आशाताईंच्या गुडघ्याच्या ऑपरेशनच्या वेळी सिंहगड रोडवरील “शेतकरी” हाॅटेलमधून त्यांच्या आवडीचा नाश्ता आणि जेवण येत असे. प्रेमापोटी हाॅटेल मालकाने त्याचे पैसे अजिबात घेतले नाहीत. मग डिस्चार्ज मिळाल्यावर आशाताई त्या हाॅटेलच्या भटारखान्यात शिरल्या होत्या आणि स्वतःच्या हाताने साऱ्या कुटुंबीयांसाठी त्यांनी चवदार कोल्हापूरी जेवण बनवले होते. मंगला खाडीलकरना एकदा आशाताईंनी जेवायला बोलावलं होतं. सगळ्या भाजीवालींशी गप्पा मारत त्यांनी मंडईतून दोन पिशव्या भरून भाजी आणली. घरी आल्यावर मंगलाताईंसाठी छान गरम टम्म फुगलेली भाकरी त्यानी थापली आणि त्यावर मोठा लोण्याचा गोळा घातला. त्यांच्यात एक छान गृहिणी लपली होती. लहानपणी आजोळी गेल्यावर दहा वर्षांची आशा सगळ्यांचं टोपलंभर धुणं घेऊन आपल्या अधू भावाला, हृदयनाथला, कडेवर घेऊन फुपाट्यानं भरलेल्या गरम रस्त्यानं चालत जायची. सामान्य बाईचे दुःख भोगणारी, वेदना सहन करणारी, नवर्याच्या हिंसक वृत्तीला तोंड देणारी, गरिबीत एका खोलीत राहून आपली मुलं मोठी करणारी आशा पुढे मात्र दुसरी महाराणी झाली.
पुण्यात रमणबागेमध्ये त्यांचा एक कार्यक्रम सुरू होता. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. पंचाहत्तरीमधील जिद्दी आशाताई छत्री नाकारून रसिकांना म्हणाल्या, “मी आजवर अनेक संकटांना सामोरी गेलीय. पाऊस तर काही क्षणांचाच आहे. मी त्याला भीत नाही. तुम्ही पावसाला भिणार की, गाणं ऐकणार ? लोक कोरसमध्ये किंचाळले, गाणं, गाणं ऐकणार ! आशाताईंनी नखशिखांत भिजत तब्बल २२ गाणी गायली. लहानपणी माईंच्या मांडीवर बसून विंगेतून त्या दीनानाथांचे काम बघत. नाट्यगीत आणि नाटक म्हणूनच
त्यांच्या मर्मबंधातली ठेव बनली होती. मोठ्या मुलाची म्हणजे हेमंत भोसलेची रचना, “शारद सुंदर चंदेरी राती” समजावून घेताना त्यांना सर्वात जास्त आनंद झाला होता. आनंद मोडकची “लाल पैठणी” गाताना आई आणि लेक दोघींचे आवाज एकाच गाण्यात काढण्याची कमालही त्यांनी केली होती. ओ.पी. नय्यरच्या मते आशाताईंच्या आवाजातला व्हाॅल्यूम आणि फोकस अतिशय कमालीचा होता. “नया दौर” पासून या जोडीचा तब्बल १५ वर्षांचा एकत्रित प्रवास एकदमच अनोखा होता. एखादं गाणं गाण्यापूर्वी त्या सिनेमातील प्रसंग, नटी कोण आहे व तिचं वय हे सारं जाणून घ्यायच्या. मग होणारं गाणं त्या प्रसंगाचा अविभाज्य भाग नाही बनलं तरच नवल. लहान मुलांच्या गाण्याला त्यांचा आवाज अगदी फिट्ट बसायचा. बघा ना, “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” हेच गाणं. “अलिबाबा चालीस चोर” या सिनेमातील “खतूबा” या गाण्यात त्यांनी काढलेले वेगवेगळे आवाज हे तर गायनकलेच्या पलिकडचेच म्हणायला हवेत. अरबी लोक लोकनृत्य करताना कसे ओरडतात ते पाहून त्यानी या गाण्याची अगदी अफलातून सुरुवात केली होती. त्यांचा गाण्याचा एकूणच प्रवास रसिकांना अगदी अचंबित करून जाणारा होता. प्रेमगीत, विरहगीत, गझल, मुजरा, कव्वाली, लावणी, कॅब्रे, डिस्को यापासून भक्तीगीत ते नाट्यसंगीत अशी सगळी गाणी त्यांनी गायली. एकाच चक्रात फिरणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते मुळी. गाण्यातले नवे नवे प्रयोग तर खूपदा त्यांच्याच गळ्यावर व्हायचे. इंग्लिश गाण्यांची स्टाइल त्यांच्या खूपच आवडीची. “इना मिना डिका” त्यामुळेच तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.
“पिया तू अब तो आजा” या गाण्यात त्या प्रियकराला बेधडक आवाहन करतात, तर “दम मारो दम” मध्ये त्यांची चक्क बंडखोरी दिसून येते. त्यांच्या “अब के बरस भेज, भइया को बाबुल” या गाण्यातील वेदना व ओढ श्रोत्यांच्या मनाला टोचत राहते. “दिल चीज क्या है, आप मेरी जान लीजिए” या गझलेतील उत्कृष्ट अंदाजासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. उमराव जान या चित्रपटाच्या निमित्ताने आशाताईंच्या आयुष्यात एक सुवर्णपर्वच आलं. यातील गाण्यांसाठी संगीतकार खय्याम यांनी त्याना अर्धा नोट खाली गायला सांगितलं होतं. आपल्याला हे जमेल असा आशाताईंनाही विश्वास नव्हता. या एका चित्रपटातील गाण्यांमुळेच एक सर्वश्रेष्ठ, अभिजात गायिका या स्थानावर त्या पोहोचल्या. “तिसरी मंझिल” या सिनेमामुळे पंचमदांबरोबर आशाताईंचे सूर सर्वार्थाने जुळले. त्यातील “आ आ आजा” हे गाणं आपण गाऊच शकणार नाही असं त्यांना वाटत होतं. मग आर.डी. ने याची चालच बदलायचं ठरवलं. पण एक आव्हान म्हणून आशाताईंनी या गाण्याचा प्रचंड सराव केला. एकदा त्यांच्या गाडीत या गाण्याचा त्या सराव करत होत्या. आशाताईंचा “आ आ आsss जा” ऐकून त्यांचा ड्रायव्हर घाबरून म्हणाला होता, “ताई, काय होतंय तुम्हाला, श्वास लागतोय बहुतेक ! गाडी जसलोकला घेऊ का ?” या गाण्यानंतर हेलन, पंचम आणि आशा ही त्रयी चांगलीच लोकप्रिय झाली होती.
एकदा पं. बिरजू महाराजांचे कथ्थक नृत्य मुंबईला नेहरू सेंटरमध्ये होते. महाराज आपल्या शिष्यांना नृत्य शिकवत होते, तेवढ्यात आशाताई तिथे आल्या. त्यांना ते नृत्य एवढे आवडले की, त्या बिरजू महाराजांबरोबर नृत्य करू लागल्या. ज्याप्रमाणे महाराज हस्तक करीत त्याप्रमाणे आशाताई पण हस्तक करीत. दोघांचेही सुंदर नृत्य पाहून शिष्यगण अगदी भारावून गेला होता.
आशाताईंच्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग आले. त्या दुःखी झाल्या पण हताश अजिबात झाल्या नाहीत. त्या म्हणायच्या,
“भोगले जे दुःख, त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की, मज हसावे लागले.” पोटची मुलं मोठी करायची हेच लक्ष्य ठेवून त्या अनेक वर्षांपर्यत काम करत राहिल्या. सर्वात जास्त गाण्यांचं रेकॉर्ड त्यांचेच आहे, जे गिनीज बुकमध्ये नोंदले गेले आहे. आशाताईंची अतिशय आवडती नायिका म्हणजे मधुबाला. त्या म्हणायच्या, ” ती इतकी सुंदर होती की, मी तिच्याकडे पहातच रहायचे. तिला पाहून मी गाणे विसरायचे. मीच तिच्या इतकी प्रेमात पडले, तर पुरुषांची काय गत होत असेल ? ”
आशाताईंचा एकदा अमेरिकेत कार्यक्रम होता. राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका ल्यूइन्स्की प्रकरण तेव्हा गाजत होतं. आशाताई नेहमी दोन गाण्यात काहीतरी खुसखुशीत बोलायच्या.” पंचमला किती दूरदृष्टी होती पहा. या गाण्याला वीस वर्षे झालीत आणि तरी ते आजही टवटवीत वाटतंय,” आणि मग “मोनिका ओ माय डार्लिंग” हे गाणं त्या गाऊ लागल्या आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
विशाल समुद्रात अक्राळविक्राळ
देवमाशाशी एखादा साहसी दर्यावर्दी रात्रंदिवस झुंजत असतो. तो रक्तबंबाळ होतो पण हार अजिबात नाही. विलक्षण धैर्याने आणि काळाला आव्हान देत आशाताई अशाच झुंज देत जगल्या. अतोनात दुःखामुळे माणूस एकतर मोडून पडतो किंवा दुःखापेक्षा मोठा होतो. आशाताईंनी दुसरा पर्याय निवडला होता.
लतादीदी आणि त्यांच्यातील फरक एकदा त्यांनी गंमतशीर शब्दांत सांगितला होता. ” दीदी म्हणजे कुठल्याशा प्राचीन मंदिरात दिवा लावणारी सात्विक आणि भारदस्त स्त्री, तर केसांच्या जटा, मोठ्ठे डोळे, मळलेला परकर पोलका अशी
गल्लीबोळात फुलं विकणारी हसरी आणि खट्याळ मुलगी म्हणजे मी. ” महाराष्ट्राने दीदींना डोक्यावर घेतलं, तर आशाताईंना कडेवर. एकदा एका पत्रकाराला त्यांनी सकाळी फोन केला होता. म्हणाल्या, मी आशा. फोन त्याच्या छोट्या भाचीने घेतला होता. ती उत्साहात म्हणाली, “हाय, तू कशी आहेस ?” पत्रकाराने एकदम घाबरून फोन काढून घेतला आणि “साॅरी” म्हणाला. आशाताई म्हणाल्या, “असू दे रे, दोन लहान उनाड मुली बोलताहेत, तर बोलू देत की !” लतादीदींबरोबर असलेल्या स्पर्धेबाबत किंवा मतभेदांविषयी कधीतरी त्याना प्रश्न विचारले जात. एकदा अशाच प्रश्नाला उत्तर देताना फटकळपणे त्या म्हणाल्या, “आमच्यात काय असेल ते असेल, ते आमचे आम्ही बघून घेऊ. पण एक लक्षात ठेवा, आम्ही दोघी कात्रीची दोन धारधार पाती आहोत. आमच्यामध्ये याल, तर कापले जाल.”
शृंगारसातील मधाळ मादकता, उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि अभंगातील
भक्तीपूर्ण आवाज आता कायमचा लोपला आहे. सुरांची बाग उजाड झाली आहे.
अरुण कुलकर्णी
९८९००९६२१०
