*जागतिक साकव्य तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम कथा*
*ती.. मी..आणि चहा…*
पावसाचा जोर आता इतका वाढला होता की समोरचं काहीच दिसेनासं झालं होतं. कोकणातल्या त्या सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या कौलारू टपरीच्या आडोशाला मी उभा होतो. हातातल्या मातीच्या कपातून चहाची वाफ नाकापर्यंत पोहोचत होती आणि मनाला एक अनामिक उभारी देत होती.
” चहा म्हणजे केवळ एक पेय नसतं ना..? ती एक उब असते, जी माणसाला आतून शांत करते…”
कुठल्यातरी पुस्तकातलं वाक्य आठवून मी स्वतःशीच बोललो, तोच पाठीमागून एक हलकासा आवाज आला.” अगदी खरं आहे तुमचं, विशेषतः जेव्हा बाहेर असं पावसाचं तांडव सुरू असतं, तेव्हा हा चहाच आपला खरा सोबती असतो.”
मी वळून पाहिलं बदामी रंगाची साडी नेसलेली, केसात एक छोटासा मोगऱ्याचा गजरा माळलेली ‘ती ‘तिथे उभी होती. तिच्या केसात पावसाचे थेंब चमकत होते,गालांवरून हळूच एखादा थेंब खाली ओघळत होता, पावसाच्या तुषारानी भिजलेला तिचा पदर वाऱ्यावर हलकेच उडत होता. तिच्या हातातही तसाच एक मातीचा कप होता. तिचे निळे डोळे गहिरे होते, जणू त्यात एखादं अर्धवट राहिलेलं काव्य दडलेलं असावं. आम्ही दोघेही एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी होतो, पण त्या क्षणी चहाच्या वाफेने आमच्यातल्या संवादाचा पूल बांधला होता.
“तुम्ही लेखिका आहात का..?” मी विचारलं. तिच्या बोलण्यातली लंय आणि शब्दांची निवड पाहून मला राहवलं नाही.
तिने एक मंद स्मित केलं, “हो,… पण शब्दांवर प्रेम करणारी एक साधी व्यक्ती आहे. आणि तुम्ही..? तुम्ही बहुदा स्वप्नांचे प्रवासी दिसताय.”
तिच्या या उत्तराने मी थोडा गडबडून गेलो. ‘स्वप्नांचे प्रवासी..? असं का वाटलं तुम्हाला..?”
“तुमच्या डोळ्यात एक शोध आहे. काहीतरी गवसल्याचा आनंद आणि काहीतरी हरवण्याची भीती, दोन्ही एकाच वेळी दिसतय,” ती म्हणाली. तिने चहाचा एक छोटासा घोट घेतला आणि पावसाकडे पाहू लागली.” पाऊस आणि चहा….. यांचं एक वेगळंच तत्त्वज्ञान आहे. पाऊस आपल्याला रडायला शिकवतो,हसायला शिकवतो, मोकळं व्हायला शिकवतो, तर चहा आपल्याला पुन्हा सावरण्याची ताकद देतो.”
तिचे शब्द माझ्या काळजाला स्पर्श करून जात होते.” कधी कधी वाटतं, काही माणसंही चहा सारखी असतात,”
मी हळूच म्हणालो.” त्यांच्याशी दोन मिनिट बोललं तरी आयुष्यातला सगळा थकवा निघून जातो. जरी आपण त्यांना ओळखत नसलो, तरी त्यांच्यात एक ओळखीची उब जाणवते.”
ती माझ्याकडे वळून बघत म्हणाली,” पण ही उब टिकवून ठेवणं कठीण असतं. कारण आपण पुन्हा आपल्या आयुष्याच्या व्यापात हरवून जातो. ही ओळख, हा संवाद,हा चहाचा कप… सगळं तिथेच राहतं, फक्त आठवण सोबत येते.”
आमच्यातला संवाद आता अनोळखी राहिला नव्हता. तो प्रेमाच्या एका अशा वळणावर पोहोचला होता, जिथे शरीर जवळ येण्यापेक्षा मन एकमेकांच्या विचारात गुंतली होती. ती जे बोलत होती, ते केवळ शब्द नव्हते, तर ते तिच्या जगण्याचं सार होतं.
” जर आपण पुन्हा भेटलोच नाही तर.?” मी विचारलं. माझ्या आवाजात एक प्रकारची हुरहुर होती.
तिने कोसळणाऱ्या पावसांच्या सरींकडे पाहिलं, जे झाडांच्या पानांवर पडून खाली ओघळत होते.” भेटींचं काय घेऊन बसलात? काही नाती ही न भेटण्यातच पूर्ण असतात. आजचा हा पाऊस, हा चहा आणि हा संवाद… हे माझ्यासाठी पुरेसं आहे. तुमचं नाव काय, तुम्ही कोठे राहता, हे जाणून घेऊन मला या क्षणाची शुद्धता घालवायची नाहीये.”
तिची ही तत्त्वनिष्ठता मला भारावून टाकणारी होती. ती भाऊक होती, पण तिचं भावनिक असणं हे वास्तवाच्या जमिनीवर पाय रोवून उभं होतं.
“गाडी येतेय….” तिने लांबून येणाऱ्या इंजिनच्या प्रकाशाकडे बघत म्हटलं.
मी तिचा चेहरा निरखून पाहिला. त्या प्रकाशात तिचा चेहरा अधिकच उजळून आला होता.” किमान पुन्हा एकदा चहा प्यायला भेटू असं तरी म्हणा,” मी हसत म्हणालो.
तिने आपला रिकामा कप खाली ठेवला आणि जाता जाता माझ्या डोळ्यात बघून म्हणाली ” पुन्हा भेटलो, तर ओळख हीच ठेवा की आपण चहाच्या एका वाफेसोबत मनमोकळी केली होती. नाव विचारून त्या ओळखीला मर्यादित करू नका.”
ती निघून गेली पावसात भिजलेली तिची ती आकृती हळूहळू अंधारात विरून गेली. गाडीही निघून गेली, पाऊसही थोडा शांत झाला पण माझ्या हातातला तो रिकामा मातीचा कप अजूनही तसाच होता. त्या कपातून आता चहाचा सुगंध येत नव्हता, तर तिच्या शब्दांचा, तिच्या तत्वांचा, आणि एका अनामिक प्रेमाचा दरवळ येत होता.
ती,. मी.. आणि चहा… ही कथा तिथेच संपली होती, पण माझ्या मनात ती एका महाकाव्यासारखी अनंत काळ जिवंत राहणार होती. काही संवाद हे शब्दांच्या पलीकडचे असतात, आणि काही भेटी या केवळ चहाच्या कपापुरत्या असूनही संपूर्ण आयुष्याला अर्थ देऊन जातात.
सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
.
