You are currently viewing मळगाव रेडकरवाडी स्मशानभुमी रस्ता श्रमदान व लोकवर्गणीतून पूर्ण…

मळगाव रेडकरवाडी स्मशानभुमी रस्ता श्रमदान व लोकवर्गणीतून पूर्ण…

अनेक वर्षांची गैरसोय दूर : लवकरच स्मशानशेडही उभारणार

सावंतवाडी
मळगाव रेडकरवाडी येथील गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला स्मशानभूमी रस्ता अखेर स्थानिक ग्रामस्थांच्या श्रमदानातून व लोकवर्गणीतून पूर्ण करण्यात आला. दीड किलोमीटर लांबीचा हा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आला यासाठी तब्बल पाच दिवस लागले. मळगाव रेडकरवाडी येथील स्मशानभूमीत जाणारा रस्ता करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते. त्याला अखेर यश आले. सुरूवातीला स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्याला लागणाऱ्या जमिनीवरील झाडेझुडपे सोडून रस्ता मोकळा केला. श्रमदानाने हे काम स्थानिक ग्रामस्थांनी पूर्ण केले. त्यानंतर तब्बल पाच दिवस जेसीबीच्या सहाय्याने हा रस्ता पूर्ण करण्यात आला. या कामासाठी माजी सभापती राजू परब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी उभारलेल्या लोकवर्गणीतून हे काम पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे रस्त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोफत जमीनही उपलब्ध करून दिली.

लवकरच या रस्त्यावर खडीकरण करण्याचा स्थानिक ग्रामस्थांनी मानस व्यक्त केला असून मळगावचे नवनिर्वाचित उपसरपंच तथा स्थानिक ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पेडणेकर यांनी यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या ठिकाणी स्मशान भूमीची शेडही बांधण्यात येणार आहे. रस्ता कामी सहकार्य करणाऱ्या माजी सभापती राजू परब, सिद्धेश धुरी, दिवाकर खानोलकर यांचे रेडकरवाडी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =