*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके यांनी दीपक पटेकर (दीपी) लिखित बकुळीची फुले काव्यसंग्रहाचे केलेलं परीक्षण*
*कविता संग्रह: “बकुळीची फुले”*
🖊️कवी: श्री दीपक पटेकर, सावंतवाडी
प्रकाशक: आरती रेडेकर,
साऊ बुक गॅलरी
कोल्हापूर
मुखपृष्ठ🖌️:अपर्णा जाधव, देवगड
मुद्रक: भारती मुद्रणालय, कोल्हापूर
पृष्ठसंख्या: ७९
किंमत: ₹.१००
“बकुळीची फुले” हा कवी श्री.दीपक पटेकर (दीपी) ह्यांचा पहिलाच कवितासंग्रह! सर्वांगसुंदर अशा ह्या काव्यसंग्रहात एकूण ६० वृत्तबद्ध कविता आहेत. आजवर आपण अनेक कविता संग्रह पाहिले असतील परंतु, सगळ्या कविता वृत्तबद्घ असणे हे मला तरी खूप अपूर्वाईचे, नव्हाळीचे वाटते. मुखपृष्ठावरील बकुळीची फुले पाहूनच त्यांचा सुवास मनात साठवत असतांना आतील अंतरंग पाहण्याची उत्सुकता वाढते. कवीने आपला हा पहिला वृत्तबद्ध काव्यसंग्रह आपल्या तीर्थरूप आईवडिलांना अर्पण केला आहे. अनुक्रमणिका वाच तांना ह्या ६० कविता कोणकोणत्या वृत्तात लिहिल्या आहेत हे कळते ! कवीचे हे पहिलेच पुस्तक आहे स्त्रीला पहिल्या अपत्यप्राप्तीचा जितका आनंद व्हावा तसाच आनंद पटेकरांना निश्चित झालेला आहे आईने आपल्या बाळाचे भरभरून कौतुक करावे तसेच किंवा काकणभर जास्तच कौतुक आपल्या नवनिर्मित काव्यसंग्रह रुपी बाळाचे झालेले आहे हे बकुळ फुले चे प्रकाशन सोहळ्याची क्षणचित्रे पाहतांना लक्ष्यात येते या पहिल्या साहित्य अपत्याच्या प्रकाशन सोहळा ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवला ते भाग्यवंत होत हितचिंतक, आप्तेष्ट व मित्रमंडळी च्या उपस्थितीत संपन्न झालेला हा दिव्य सोहळा होता दीपी यांना झालेला आनंद कल्पनातीत होता हे नक्कीच..! त्यांचा हा पहिला कविता संग्रह ०३ जानेवारी म्हणजे सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी प्रकाशित झाला हे देखील विशेष आहे.
“बकुळीची फुले” या काव्यसंग्रहाला प्रस्तावना कवी, गझलकार, समीक्षक, काव्यगुरू श्री.विजय जोशी (विजो) यांची आहे. विजो जोशींनी पटेकरांच्या कविता संग्रहाला प्रस्तावना देणे ह्यातच पटेकरांच्या कविता संग्रहाचे यश दडलेले आहे. प्रा.डॉ.जी. ए. बुवा (निवृत्त उपप्राचार्य, ग्रंथपाल, सावंतवाडी संस्थान इतिहासाचे विशेष अभ्यासक) ह्यांचे आशीर्वाद
मिळणे म्हणजे दुधात साखर पडण्यासारखेच..! हा दुग्धशर्करा योग दोन्ही मान्यवरांचा पटेकरांवर असलेला अकृत्रिम स्नेह दर्शवितो हे निश्चित!
स्वतः पटेकर हे एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि रसायनशास्त्र विषयाचे पदवीधर असूनही मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे हे विशेष..! संवाद मीडिया न्यूज चॅनेलचे ते कार्यकारी संपादक आहेत, कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडीचे अध्यक्ष आहेत, श्रीशब्द लालित्य समूहाचे प्रशासक, ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गचे निमंत्रित कार्यकारिणी सदस्य, श्री.काडसिद्धेश्वर से.स.ट्रस्ट, सावंतवाडीचे कार्यकारिणी सदस्य, श्रीदत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती(टेंबेस्वामी) मंदिर उपसमिती सदस्य, व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीचे जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुख असलेले दीपक पटेकर(दीपी) हे बहुहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. लहानपणापासून संघर्षाशी सामना करून आज ते यशोशिखरावर पोहचलेले असूनही त्यांचा नम्रपणा रसिक वृत्ती पुस्तकात क्षणोक्षणी जाणवते
या काव्यसंग्रहाच्या सुरुवातीलाच अनलज्वाला वृत्तात लिहिलेल्या “माझा गाव” ह्या पहिल्या कवितेत कवी गावाविषयी असलेले आपलं प्रेम व्यक्त करतात, गावाची वैशिष्ट्ये सांगतात. त्याच वृत्तातली “चाफा फुलला” ही कविता फुललेल्या चाफ्याचे सुंदर चित्र डोळ्यासमोर उभे करते. “संध्याकाळ” कवितेत संध्याकाळचे वर्णन करतांना शेतावरून परत येणारा शेतकरी व गोठ्यातील गायीचे सुंदर शब्दचित्रण केले आहे. “बहाणे” (आनंद कंद) “भेट” (पादाकुलक) “स्वप्न रंग” (वर्षा) “तू नयनांमध्ये दिसते” (भूपती) ह्या कविता कवीच्या तरुण मनाचे दर्शन घडवितात. “संसार” ही लवंगलता वृत्तातली कविता पतीपत्नीच्या कोमल नात्याचे सुंदर दर्शन घडविते. “सोडून द्यावे”, “संस्कार”, “वादाचे कारण” ह्या कविता कवीला सामाजिक भान असल्याचा दाखला देतात तर “काळाचा महिमा” ही जीवनसत्य सांगणारी कविता वाचून मन स्वतःशीच विचार करू लागते. “वडापाव” ही पादाकुलक वृत्तातली कविता वाचतांना वडापाव वर सुद्धा इतकी सुरेख कविताकरता येते हे जाणवून फार हसायला येते. “प्रश्नच पडतो आहे” ही कविता खरोखरच मनाला प्रश्न विचारते. कवींच्या ६० ही कविता वेगवेगळ्या भावना प्रगट करणाऱ्या असून वाचकांना हे वर्णन आपल्यालाच लागू पडते आहे असे वाटणाऱ्या आहेत. आजकाल नवोदितांच्या पुस्तकांच्या किमती २००/२५० वगैरे असतात. वृत्तबद्ध कविता कशा अर्थपूर्ण रसाळ असाव्यात हे कळण्यासाठी नवोदितांना हे पुस्तक म्हणजे अलभ्य लाभ वाटावा मला तर असे वाटते , नव्हे खात्री आहे की अशाप्रकारचे वृत्तबद्ध कवितांचे हे पहिलेच पुस्तक असावे वृत्तबद्ध कविता लिहिणाऱ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शनपर असताना देखील काव्यसंग्रहाची किंमत अगदीच नगण्य म्हणजे ₹.१०० आहे नाममात्र किंमत असलेल्या ह्या पुस्तकासाठी वापरलेला कागद उच्च प्रतीचा आहे आईने आपल्या बाळाला सजवावे तसे हे पुस्तक जास्तीत जास्त सुरेख करण्याचा कवींच्या प्रयत्नाचे ठायीठायी दर्शन होते कवीने पुस्तक म्हणजे व्यवहार नसून साहित्य सेवा असल्याचा आदर्श निर्माण केला आहे.
पुस्तकाच्या सुरवातीला व शेवटी लेखकाच्या साहित्यिक योगदानाची नामांकित वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमींची छायाचित्रे आहेत. ही अभिनव कल्पना त्यांच्या भगिनी चित्रकारा कु.अपर्णा हिची आहे हे ते आवर्जून सांगतात. एकापेक्षा एक बहारदार असलेल्या कविता वेगवेगळ्या वृत्तात असल्याने काव्यसंग्रह दृष्ट लागण्यासारखा सर्वांग सुंदर झालेला आहे. दृष्ट लागू नये म्हणून एक काजळतीट आहे असे मला वाटते. ह्यात आदरणीय प्रा.डॉ. जी. ए. बुवांचा फोन नंबर नाही.
काव्यसंग्रहाला दिलेले बकुळीची फुले हे नाव खूप छान बकुळीची फुले ज्याप्रमाणे न सुकताअनेक दिवस आपला मंद सुगंध देत राहतात त्याप्रमाणेच ह्या काव्यसंग्रहातील काव्यफुलें रसिकांना काव्यानंद देत राहतील ह्या सगळ्या रचना कधीच न सुकणाऱ्या आहेत वृत्तबद्ध लिहिणे शिकणाऱ्यांना त्या नेहमीच आनंद देतील
पटेकरांचा अशा जवळपास ६०० कविता आहेत. त्या सर्व रसिकांसाठी लवकरच प्रकाशित व्हाव्यात तसेच त्यांचे “अंतरीचे बोल” हे प्रभातकालीन सदर व त्यांच्या सुंदर ललित लेखनाचा ललितबंध सुद्धा पुस्तकरूपाने लवकरच प्रकाशित व्हावा ह्यासाठी श्री.दीपक पटेकरांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा…
बकुळीची फुले ह्या काव्यसंग्रहासाठी खूप अभिनंदन
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
