भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी
सिंधुदुर्गनगरी
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र युवक-युवतींसाठी Service Selection Board (SSB) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे SSB कोर्स क्रमांक ६५ आयोजित करण्यात आला आहे. हा कोर्स दि. ४ ते १३ मे २०२६ या कालावधीत होणार आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर राहावे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण सिंधुदुर्ग कार्यालय येथे दिनांक 29 एप्रिल 26 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील SSB-65 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.
एस.एस.बी.वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेऊन यावेत :-अ). कम्बाईड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन(CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंन्स अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. ब) एनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेंटर असावे. क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एस एस बी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेले यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छाञ पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्रमांक ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
