*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*श्री परशुराम*
परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात.. त्यांचा जन्म जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय्य तृतीयेला झाला..
जमदग्नी ऋषी व माता रेणुका यांचे परशुराम हे पुत्र. अक्षय तृतीया हा त्यांचा जन्मदिन. या भार्गवरामाने परशु या शस्त्राने दुष्टांचे निर्दालन केले म्हणून ते परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले… परशुराम हे सप्तचिरंजीवांपैकी एक आहे.
भीमकाय देह, मस्तकी जटाभार, खांद्यावर धनुष्य व हातात परशू अशी परशुरामाची मूर्ती असते…
विष्णूचा सहावा अवतार मानल्या गेलेल्या भगवान परशुरामांचे स्वतंत्र चरित्र सांगणारा एकही प्राचीन ग्रंथ उपलब्ध नाही.. .रामायण महाभारतासह वेगवेगळ्या महापुराणांतून परशुरामांचे चरित्र तुकड्यातुकड्याने प्रसंगानुरूप आले आहेत.. तर .काही पुराणांत परशुरामांसंबंधीच्या आख्यायिका आणि दंतकथाही वाचनात आल्या आहेत..
परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी सह्याद्री पर्वतावरून शरसंधान करून अरबी समुद्रास मागे हटवले व तिथे कोंकणभूमी वसविली… कोकण भूमी ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमी आहे… कोकणला देवभूमी मानण्यात येते. येथील सुंदर निसर्ग
अथांग सागराचे व सह्याद्रीच्या शिखरांचे सान्निध्य व लोकोत्तर महापुरुषांची जन्मभूमी हे कोकणचे वैशिष्ट्य या देवभूमीत शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेली अनेक देखणी मंदिरे आहेत…
श्रीक्षेत्र परशुराम हे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले महेंद्र पर्वतावरील तीर्थक्षेत्र आहे…चिपळूणपासून पाच मैलांवर असलेल्या या तीर्थक्षेत्रास श्रीपरशुरामांच्या वास्तव्यामुळे पौराणिक संदर्भ आहेत व परमहंस ब्रह्मेंद्रस्वामी यांनी तीनशे वर्षांपूर्वी तेथे उभारलेल्या प्रकल्पाला व महाराष्ट्रभर केलेल्या सार्वजनिक व हिंदवी स्वराज्याच्या कार्याला विशेष महत्त्व आहे. .तसेच परशुरामाचे वास्तव्य कर्नाटकातील पवित्र ‘गोकर्ण’ क्षेत्री असल्याचेही मानतात. चिपळूण येथे ‘लोटे परशुराम’ हे त्यांचे जाज्वल्य स्थान मानले जाते. तसेच तळकोकणातील परशुराम मंदिर प्रसिद्ध आहे. काही कोकणस्थ ब्राह्मणांचे कुलदैवत परशुराम आहे.
परशुरामांची आई- माता रेणुका हिचे अस्तित्व ‘माहूर गडा’वर असून ते साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. रेणुकामाता देखील महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कुटुम्बांची कुलदेवता आहे. तिनेच आपल्या पुत्राला परशुरामाला चिरंजीवी बनवले होते…
भगवान परशुरामांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि काश्मिरपासून अरूणाचलपर्यंत संपूर्ण भारत आपल्या कार्यकर्तृत्वाने सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध केला होता.
देशभर पसरलेली परशुरामांची काही मंदिरे ..
निरमुंड – निरमुंड हे हिमालयाच्या अंतर्भागातील परशुरामांचे सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. याच ठिकाणी पित्याच्या आज्ञेने परशुरामांनी माता रेणुकेचा शिरच्छेद केला म्हणून या स्थानाला निरमुंड या नावाने ओळखले जाते..
रेणुकागिरी ग्राम – हिमाचल प्रदेशातील परशुरामांचे हे स्थान उत्तरेला अतिदुर्गम भागात तिबेटच्या सीमेलगत आहे…
परशुराम कुंड – ईशान्य भारतातील अरूणाचल प्रदेशात चीन आणि ब्रह्मदेशच्या सीमेवर लोहित नदीपात्रात हे स्थान आहे…
करुक्षेत्र – हरियाणातील कुरुक्षेत्र प्रसिद्ध आहे. ते कौरव पांडवांच्या महायुद्धासाठी. या कुरुक्षेत्र परिसरातच पाच मोठी सरोवरे असून त्यातील ब्रह्म सरोवर हे परशुरामांशी संबंधीत प्राचीन स्थान आहे.
जम्मु येथील परशुराम मंदिर – हिमालयात परशुरामांचा वावर काराकोरम खिंडीपासून अरुणाचलपर्यंत होता. त्यामुळे या संपूर्ण प्रदेशात जागोजाग परशुरामांची लहानमोठी स्थाने आहेत. जम्मू प्रांतात शिरतानाच परशुरामांचे एक मंदिर उंच पर्वतावर उभे आहे…
जन्मस्थळ जानापावा – परशुरामांचा जन्म चंबळ नदीच्या खो-यात असलेल्या जमदग्नी आश्रमात झाला. एका उंच पर्वतावरील या आश्रमाच्या परिसराला जानापाव असे म्हटले जाते. प्राचीन काळापासून जमदग्नी आश्रम अशीच याची ओळख आहे. येथे जमदग्नी ऋषींची मूर्ति असणारे एक प्राचीन मंदिर आहे आणि जवळ परशुरामांची काळ्या दगडाची सुबक मूर्तीअसणारे दुसरे मंदिर आहे…
उदावड गुंफा मंदिर – राजस्थानीतील सादडी खेड्याजवळ हे उदावड मंदिर उंच टेकडीवरील गुंफेमधे आहे. आपल्याकडे प्रचलित असणा-या देवपंचायतनात परशुरामाचा समावेश नसतो पण या गुंफेमधे पंचायतन असून त्यातील मुख्य देवता परशुराम आहे व त्यांच्या शेजारी गणेश, कार्तिकेय, शिव आणि पार्वती यांच्या मूर्ती आहेत…परशुरामांची मूर्ती तपश्चर्या मुद्रेत आहे…
त्र्यंबकेश्वर – नाशिकजवळचे त्र्यंबकेश्वर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिध्द आहे. त्र्यंबकेश्वराचा हा परिसर परशुरामांनी येथे केलेल्या घनघोर तपश्चर्येसाठीही ओळखला जातो. येथे पूर्वी परशुरामांचे प्राचीन मंदिर होते आता तेथे उभे असलेले मंदिर १२५ वर्षांपूर्वीचे आहे असे सांगितले जाते.. मंदिरातील परशुरामांची मूर्ती वैष्णव पध्दतीची म्हणजे चतुर्भुज आहे. परशुराम मंदिरात एक स्वतंत्र नारायण मूर्तीही असून ती काळ्या चमकदार गंडकी पाषाणाची आहे सम्राट सातवाहनांनी नाशिक क्षेत्री अश्वमेधासह मोठे यज्ञ केले. त्यांचे शिलालेख नाशिकजवळ मिळाले आहेत. परशुरामांची प्राचीन मूर्ती या यज्ञांच्या निमित्ताने स्थापन करण्यात आली असावी असे अनेक संशोधकांचे म्हणणे आहे..
त्र्यंबक-परशुराम क्षेत्र या नावाने हा परिसर ओळखला जातो…
शूर्पारक क्षेत्र – गेल्या अनेक वर्षांपासून शूर्पारक या नावाने ओळखले जाणारे बंदर म्हणजे आजचा वसईजवळचा नालासोपारा हा भाग.. येथे विमलासुराने यज्ञयागात व्यत्यय आणल्यामुळे परशुरामांनी शस्त्र हाती घेतले आणि त्याचा वध केला अशी आख्यायिका सांगितली आहे. विमलासुराच्या अत्याचाराने उध्वस्त झालेला हा संपूर्ण परिसर परशुरामांनी स्वतः पुन्हा वसविला म्हणून तो परशुराम क्षेत्र या नावाने ओळखला जात असे. शूर्पारक हे त्याचे अपभ्रष्ट रूप आहे. परशुरामांची येथे असलेली मूर्ती काळ व काम सोबत असलेली आहे. रेणुका व जमदग्नी यांचीही स्वतंत्र मंदिरे येथे आहेत.
तिरूअनंतपूरम – केरळची राजधानी तिरूअनंतपुरमच्याजवळ कलियार आणि कालामानायर आणि पार्वतीपू या दोन नद्यांचा संगम आहे. या संगमाला तिरूवल्लभवृंदा असे म्हटले जाते. या संगमाजवळच नदीकिना-यावर एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असणा-या या मंदिरात पोचण्यापूर्वीच प्रवेशद्वारावर आपले परशुरामांच्या एका भव्य मूर्तीने स्वागत होते. व्याघ्रांबरावर बसलेली सहा फूट उंचीची ही आसनस्थ मूर्ति आक्रमक असली तरी अभय देणारी आहे. या मूर्तीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर उजवीकडे घनदाट झाडीत परशुरामांचे प्राचीन मंदिर आहे. खास दाक्षिणात्य पध्दतीच्या गोपुरसदृश मंदिरात मध्यभागी परशुरामांची चतुर्भुज मूर्ती आहे मूर्तीच्या हातात परशु, शंख, चक्र आणि कमंडलू आहेत त्यावरून ती वैष्णव पध्दतीची मानली जाते. या मूर्तीजवळच ब्रम्हदेव आणि शिव यांच्या सोपानयुक्त घुमट्या आहेत. ..
अष्टचिरंजीवांपैकी एक आणि निस्सीम मातृभक्त असणारे श्री परशुराम ..श्रीविष्णूंचा हा एकच अवतार असा आहे जो चिरंजीव आहे असे सांगितले जाते. परशुरामाचे खरे स्वरुप अत्यंत सच्चे, मातृ-पितृ भक्त असेच आहे…
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
