You are currently viewing मोती तलाव परिसरातील गॅस पाईपलाईन कामावर ब्रेक; नगरसेवक देव्या सुर्याजी आक्रमक

मोती तलाव परिसरातील गॅस पाईपलाईन कामावर ब्रेक; नगरसेवक देव्या सुर्याजी आक्रमक

मोती तलाव परिसरातील गॅस पाईपलाईन कामावर ब्रेक; नगरसेवक देव्या सुर्याजी आक्रमक

“आधी खणलेले रस्ते दुरुस्त करा, मगच पुढील काम” — कंपनीला इशारा; नागरिकांच्या समस्यांकडे वेध

सावंतवाडी :

सालईवाडा परिसरात तीन महिन्यांपासून खणून ठेवलेल्या रस्त्यांची दुरवस्था कायम असताना मोती तलाव भागात सुरू असलेले गॅस पाईपलाईनचे काम नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी थेट बंद पाडले. “जोपर्यंत मागील काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुढील काम करू देणार नाही,” असा इशारा देत त्यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला जाब विचारला.
मोती तलाव परिसरात सुरू असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर श्री. सुर्याजी यांनी एमएनजीएल अधिकाऱ्यांना सोबत घेत निंबाळकर पीर, कामत नगर, कळसुलकर स्कूल, दैवज्ञ मंदिर ते युको बँक परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था प्रत्यक्ष दाखवून दिली. चुकीच्या पद्धतीने रस्ते बुजविल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले असून अरुंद रस्त्यांमुळे महिलांच्या अपघातांच्या घटनाही घडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
रस्त्यांवरील मातीचे ढीग समांतर करणे, मातीने बुजवलेली गटारे तातडीने मोकळी करणे तसेच डांबरीकरण होईपर्यंत रस्त्यावर पाणी मारण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. दरम्यान, खडीकरण व डांबरीकरणासाठीची रक्कम कंपनीकडून नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आली असून पुढील काम नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
याचवेळी श्री. सुर्याजी यांनी मुख्याधिकाऱ्यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. “जोपर्यंत खणलेले रस्ते पूर्ववत होत नाहीत, तोपर्यंत पुढील काम सुरू करू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. मुख्याधिकाऱ्यांनीही कंपनीच्या अधिकाऱ्यांना आधी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
या प्रसंगी मेहर पडते, ॲड. प्रथमेश प्रभू, श्री. सावंत तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा