You are currently viewing सावंतवाडीत उद्या शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन; नूतन कार्यकारिणी जाहीर होणार

सावंतवाडीत उद्या शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन; नूतन कार्यकारिणी जाहीर होणार

*सावंतवाडीत उद्या शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन; नूतन कार्यकारिणी जाहीर होणार*

सावंतवाडी :

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सावंतवाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन उद्या, बुधवार दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० ते सायं. ६.०० या वेळेत मंगिरीश हॉल, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते तर समीर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या प्रसंगी राज्य महासचिव राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, सरचिटणीस तुषार आरोसकर तसेच शिक्षिका नेत्या सुरेखाताई कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तसेच पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आणि गटशिक्षणाधिकारी सविता परब हे मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात प्रमुख वक्ते म्हणून नपा/मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद तौदकर तसेच राज्य महिला आघाडी अध्यक्षा वर्षा केनवडे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, चंद्रकांत अनावकर, नंदकुमार राणे आणि सुनील चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या अधिवेशनात सन २०२२ ते २०२६ या कालावधीतील कार्याचा आढावा (कार्य अहवाल) सादर करण्यात येणार असून नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करणारी व त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर तसेच कायदेशीर लढा देणारी संघटना म्हणून शिक्षक समितीची ओळख निर्माण झाली आहे.
अधिवेशनास मोठ्या संख्येने शिक्षक बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष समीर जाधव व सचिव हेमंत सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा