You are currently viewing सावंतवाडीत जयानंद मठकर व्याख्यानमालेला उत्साहात प्रारंभ

सावंतवाडीत जयानंद मठकर व्याख्यानमालेला उत्साहात प्रारंभ

कमलताई परूळेकर यांच्या हस्ते उद्घाटन; विविध पुरस्कारांचे वितरण, मान्यवरांची व्याख्याने चार दिवस रंगणार

सावंतवाडी / (प्रतिनिधी):

श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी आणि सावंतवाडी सहकारी पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यसैनिक जयानंद मठकर व्याख्यानमालेस मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. ७ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या व्याख्यानमालेचे यंदाचे २२ वे वर्ष असून उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परूळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. यंदाचा मठकर स्मृती पुरस्कार ओणी राजापूर येथील वात्सल्य मंदिरचे संस्थापक डॉ. महेंद्र मोहन यांना प्रदान करण्यात आला. बांदा येथील मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

तसेच प्राचार्य अल्ताफ खान उत्कृष्ट वाचक पुरस्कार कवी मधुकर मातोंडकर, प्रा. पांडुरंग येजरे कार्यकर्ता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार, तर प्रा. मिलिंद भोसले स्मृती ग्रंथालय वाचक पुरस्कार राजश्री टिपणीस यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणचा जीवन गौरव पुरस्कार डॉ. महेंद्र मोहन यांना देण्यात आला.

कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. महेंद्र मोहन यांनी “पुस्तक वाचताना माणसं वाचायला शिकलो” असे सांगत ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचा आपला प्रवास उलगडला. तर डॉ. रुपेश पाटकर यांनी योग्य व्यक्तींचा सन्मान झाल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांनी केले तर आभार रमेश बोंद्रे यांनी मानले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील चार दिवस विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने संपन्न होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा