*समाज विकास संस्थेच्या पुढाकारातून पुनर्विवाह संपन्न*
उमरगा (प्रतिनिधी):
समाजातील अनिष्ट रूढी-परंपरेला छेद देत विधवा,परित्यक्ता कुमारी माता आणि उपेक्षितांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पेरण्यासाठी समाज विकास संस्था नियमित कार्य करत आहे.संस्थेचे सचिव सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ, ॲड. मंगेश येळीकर आणि डॉ. कल्पना वाघ यांच्या विशेष पुढाकारातून गुंजोटी येथील सागर म्हेत्रे आणि समीक्षा म्हेत्रे यांचा शुभविवाह आज, ३ एप्रिल २०२६ रोजी उमरगा येथील संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला.
**शिवधर्म आणि आर्य समाज पद्धतीचा संगम**
हा विवाह सोहळा केवळ एक विवाह नसून तो सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा ठरला. शिवधर्म पद्धत आणि आर्य समाज पद्धतीचा संयुक्त प्रवाह वापरून हा ‘शिवविवाह’ लावण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई वाघ यांनी कन्यादानाचे पवित्र कार्य पार पाडले.
**परिवर्तनवादी विचारांचा जागर**
यावेळी बोलताना ॲड. मंगेश येळीकर यांनी स्पष्ट केले की, ” शाहू फुले, आंबेडकर यांचा विचार घेऊन समाजात वाढणारी विषमता कमी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.विधवा,परित्यक्ता आणि कुमारी माता ई. चे विवाह लावून त्यांना सन्मानाचे आयुष्य सजगन्यासाठी वाटा सुखकर करणे ही काळाची गरज आहे. महिलांना समाजात आदराचे स्थान मिळावे आणि त्यांनी शिक्षित व्हावे. यासाठी आपण सर्वांनी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे .
भूमिपुत्र वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांच्या समतावादी विचारांवर समाज विकास संस्था कार्यरत आहे.धर्मव्यवस्थेच्या जाचक अटींमुळे अनेक पिढ्या उद्ध्वस्त झाल्या, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संस्था अशा विवाहांचे सातत्याने आयोजन करेल. भविष्यकाळात पुनर्विवाहाचा सर्व खर्च संस्था उचलणार असून गरजूंनी संस्थेशी संपर्क साधावा.”
**शुभेच्छांचा वर्षाव**
डॉ. कल्पना वाघ यांनी नवदाम्पत्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला उमरगा आणि गुंजोटी परिसरातील मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य, अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेसचे पदाधिकारी, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राज जाधव, अस्मिता सुरवसे, शितल गहेरवार, अक्षय कांबळे आणि रंजना यांनी विशेष परिश्रम घेतले..
