*संदीप गावडे फाऊंडेशन आयोजित ‘यशवंत’ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा बांदा येथे सुरळीत पार*
*बांदा*
संदीप गावडे फाऊंडेशन आयोजित ‘यशवंत’ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा बांदा येथे उत्साहपूर्ण व शांततेत पार पडली. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्पर्धात्मकता आणि अभ्यासाची प्रेरणा निर्माण झाली.
लहान वयातच शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या बुद्धिमत्तेला योग्य दिशा मिळावी आणि भविष्यातील मोठ्या परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
बांदा येथील परीक्षा केंद्राला जिल्हा परिषद सदस्य व फाऊंडेशनचे संस्थापक संदीप गावडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, अभ्यासात सातत्य ठेवावे आणि भविष्यात मोठे यश संपादन करावे, असे प्रेरणादायी विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
त्यांच्यासोबत सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरांग मुळीक, फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीर गावडे, मुख्याध्यापक शांताराम असनकर, फाऊंडेशनचे सदस्य गोविंद नेर्लेकर, महेश सावंत, हंसराज गवळे, स्वाती पाटील,नेहा सावंत, आशिष तांदुळे, हेमंत सावंत, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, आनंद कोळापटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जे. डी. पाटील यांनी केले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी संदीप गावडे यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल पालकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख करून देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
