Geo-Referencing त्रुटींमुळे शेतकऱ्यांची पिक नोंदणी अडचणीत; भात, आंबा, काजू पिकांच्या नोंदीसाठी मुदतवाढीची मागणी
मुंबई :
शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन डिजिटल क्रॉप सर्वे (ई-पिक पाहणी) मोबाईल ॲपद्वारे पिक नोंदणी करताना शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणींबाबत निवेदन देत सविस्तर चर्चा केली.
सध्या ई-पिक पाहणी करताना नकाशासंदर्भातील (Geo-Referencing) तांत्रिक त्रुटींमुळे प्रत्यक्ष शेतात उपस्थित असतानाही मोबाईल ॲपमध्ये संबंधित गट किंवा सर्वे क्रमांकापासून अंतर दाखवले जाते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिक नोंदणी करता येत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना शासन दराने भात विक्री करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत असल्याचे आग्रे यांनी मंत्री कदम यांच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच खरीप हंगामातील भात पीक, आंबा, काजू आदी पिकांच्या नोंदीसाठी तसेच भात खरेदी नोंदणीसाठी दिलेली मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या प्रक्रियेचा लाभ घेता येईल.
या समस्येची गांभीर्याने दखल घेत मंत्री योगेश कदम यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून ई-पिक पाहणी ॲपमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली.
