परिस्थितीवर मात करत मुंबई विद्यापीठात दिपाली मेस्त्री ने मिळवलं सुवर्णपदक
सावंतवाडी प्रतिनिधी
तालुक्यातील तिरोडा गावातील एका सर्वसाधारण घरातील दिपाली वासुदेव मेस्त्री हिने एमएस्सी (इंजीनियरिंग मॅथेमॅटिक्स) या अभ्यासक्रमात उत्तुंग असे यश प्राप्त करत मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. मास्टर ऑफ सायन्स च्या सर्व शाखांमध्ये प्रथम येत तिने मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले आहे.
घरच्या गरिबीवर मात करत तिने आपल्या अभ्यासाच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे.२ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ऑनलाईन पदवीदान समारंभात तिला हे सुवर्ण पदक जाहीर करण्यात आले आहे. तिने आपले प्राथमिक शिक्षण तिरोडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ मध्ये पूर्ण केले असून, ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण अ.वि.बावडेकर महाविद्यालय शिरोडा येथे पूर्ण केले आहे.
वा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालय शिरोडा येथे तिने आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी नवी मुंबई येथे तिने आपले बीएस्सी (मॅथेमॅटिक्स) शिक्षण पूर्ण करत पदवी प्राप्त केली आहे. तर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधून तिने २०१७-१९ या शैक्षणिक वर्षात तिने पदवीत्तर पदवी प्राप्त केली आहे. तिने प्राप्त केलेल्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान गौरवाने उचावली असून सर्व क्षेत्रातून तिचे अभिनंदन केले जात आहे. सरकारच्या फर्स्ट स्टेप ऑफ इन्स्पायर फीलोशिपसाठी तिची निवड झाली असून ती आता पीएचडी करणार आहे.