You are currently viewing घारपी शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविता गायन स्पर्धेचा सुरेल सोहळा

घारपी शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविता गायन स्पर्धेचा सुरेल सोहळा

घारपी शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविता गायन स्पर्धेचा सुरेल सोहळा

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साह, अभिमान आणि भावनांच्या दरवळात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कविता गायन स्पर्धेने संपूर्ण शाळा परिसर अक्षरशः सुरांनी न्हाऊन निघाला.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मंचावर येत मराठी कवितांचा गोडवा आपल्या सुरेल आवाजातून साकारला. “कणा”सारख्या प्रेरणादायी कवितांपासून ते निसर्ग, मातृभाषा आणि देशभक्ती व्यक्त करणाऱ्या विविध विषयांवरील कविता विद्यार्थ्यांनी लयबद्ध सादर केल्या.
यावेळी विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तकातील कवितांचे हावभावयुक्त आणि अर्थपूर्ण सादरीकरण घेण्यात आले. प्रत्येक ओळीतून व्यक्त होणारा भाव, चेहऱ्यावरची निरागस अभिव्यक्ती आणि स्पष्ट उच्चार यामुळे सादरीकरण अधिक प्रभावी ठरले. या काव्यगायन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे गट पहिली ते दुसरी – मानस नाईक,किर्ती गावकर, श्रेया असनोडकर,यज्ञा कविटकर , सौम्या गावडे, गट तिसरी चौथी -स्वप्निल गावडे, गार्गी गावडे,रूची नाईक,रूद्र सावंत ,समर्थ कविटकर, गट पाचवी ते सातवी -वैष्णवी गावडे, इशिका असनोडकर,स्वप्नाली गावडे, यशस्वी सावंत ,बाबाजी कविटकर, भिकाजी नाईक, बळीराम गावडे. सिध्दी कविटकर,राज गावडे
यावेळी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून सांगितले
“मराठी ही आपल्या अस्मितेची ओळख आहे. कविता गायनातून भाषेची गोडी वाढते, संस्कार रुजतात आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास फुलतो.”
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी मराठी भाषा जपण्याची व समृद्ध करण्याची शपथ घेतली. “जय मराठी, जय महाराष्ट्र!” या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जे.डी.पाटील व सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा