मळगांव बॉक्सेलकडील बहिर्वक्र आरशांची तोडफोड

मळगांव बॉक्सेलकडील बहिर्वक्र आरशांची तोडफोड

मालमत्तेच्या नुकसानी प्रकरणी ग्रामपंचायतची पोलिसात तक्रार

सावंतवाडी

झाराप-पत्रादेवी बायपासच्या सावंतवाडी रेडी मार्गावरील मळगाव बॉक्सेललगत वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून बहिर्वक्र आरसे लावण्यात आले आहेत. यातील दोन आरशांची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मळगाव प्रशासनाने अज्ञाता विरोधात ग्रामपंचायत मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सावंतवाडी रेडी मार्गावरील या बायपासच्या बॉक्सेललगत असलेल्या सर्विस रोडवरून येणाऱ्या वाहनांमुळे बॉक्सेलमधून जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. या अपघातात काही जणांना गंभीर दुखापत झाली होती तर अनेक वाहनांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर सर्विस रोड वरून येणारी वाहने निदर्शनास यावी यासाठी या ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसविण्यात यावेत अशी मागणी स्थानिक वाहनधारकांमधून होत होती.

या पार्श्वभूमीवर मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी पुढाकार घेत रोटरी क्लब सावंतवाडीकडे या बहिर्वक्र आरशांची मागणी केली होती. त्यानंतर रोटरी क्लबच्या सहकार्यातून या ठिकाणी चार आरसे बसविण्यात आले होते. यातील बांदा सर्विस रोड वरील आरसा काही दिवसांपूर्वी अज्ञाताने मोडतोड केल्याचे निदर्शनास आले होते. तर गुरुवारी कुंभारवाडी सर्विस रोडवरील आरशाची अज्ञाताने तोडफोड केली.

त्यामुळे हा प्रकार कोणा कडून तरी जाणून बुजून होत असल्याचा संशय ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केला आहे. वाहनधारकांच्या पर्यायाने नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे साऱ्यांनी कौतुक केलेले असताना माथेफिरू अज्ञातांकडून होत असलेल्या या प्रकाराबाबत तीव्र निंदा व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत सावंतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली असून या अज्ञातांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा