वैभववाडी
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. मध्ययुगीन कालात हिंदूधर्म व संस्कृतीचे पुनरुज्जीवन करून संस्कृती रक्षण केले. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याबरोबरच समाजातील जातीभेद नष्ट करून स्त्रियांचा सन्मान,पर्यावरण संवर्धन, अंधश्रध्देचा त्याग, राष्ट्रप्रेम व कर्तृत्वाला प्राधान्य देऊन एक नवी परंपरा निर्माण केली. चारशे वर्षापूर्वी शिवरायांनी अंमलात आणलेला आदर्श आपण आजही घेतलेला दिसत नाही. शिवरायांच्या आदर्श तत्वांचा स्वीकार करणे हाच शिवजयंती उत्सवाचा मुख्य हेतू असला पाहिजे असे प्रतिपादन प्रा.एस.एन.पाटील यांनी केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, इतिहास विभाग आणि आजी-माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.ए.एम.कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.एम.आय.कुंभार, प्रा.व्ही.सी.काकडे, प्रा.डाॕ.डी.एम.सिरसट व श्री.संजय रावराणे उपस्थित होते.
सुरवातीला शिवप्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. सत्यजित रावराणे, अतिश माईणकर, शुभम सुतार, दिव्या लाड व रुपाली जाधव या विद्यार्थ्यांनी छ.शिवराय व मावळे यांच्या वेशभुषेत व्यासपीठावर केलेले आगमन हे शिवजयंतीचे खास आकर्षक होते. शिवरायांनी प्रत्येक गोष्ट नियोजन करुन केल्यामुळे ते स्वराज्य निर्माण करु शकले. प्रत्येक कामाचे नियोजन करुन वाटचाल केल्यास जीवनात यशस्वी होता येते हा शिवरायांचा मार्ग सर्वांनी स्वीकारावा असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॕ.सी.एस.काकडे यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल पांचाळ, रुपेश वारंग,केशव रावराणे,सुरज रावराणे, प्रथमेश कोळेकर, महेश सावंत, शुभम गुरव व ऋषिकेश धावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राद्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.एम.आय.कुंभार यांनी केले तर आभार प्रा.डाॕ.डी.एम.सिरसट यांनी मांडले.